पावसाच्या आगमनाने खरीप पिकांना संजीवनी pudhari photo
धाराशिव

Bhoom agriculture : पावसाच्या आगमनाने खरीप पिकांना संजीवनी

भूम तालुक्यातील चित्र, शेतकर्‍यांच्‍या चेहर्‍यावर समाधान

पुढारी वृत्तसेवा

अब्बास सय्यद

भूम : गेल्या आठवड्यात पावसाने सुरुवात केल्याने भूम तालुक्यातील खरीप पिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. वेळेवर झालेल्या पावसामुळे सध्या तालुक्यातील खरीप पिके बहरलेली दिसत असून शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधानाचे वातावरण आहे.

तालुक्यात यंदा जवळपास ६० हजार ४५० हेक्टर क्षेत्रावर खरीप पिकांची पेरणी झाली असल्याची माहिती तालुका कृषी अधिकारी अतुल ढवळे यांनी दिली. यामध्ये सोयाबीन पिकाचा सर्वाधिक वाटा असून ४९ हजार ३३७ हेक्टरवर सोयाबीन, उडीद २ हजार ६२० हेक्टर, मूग ५२६ हेक्टर, मका ८५१ हेक्टर, तूर १ हजार ५१६ हेक्टर तर नवीन ऊस लागवड १८४ हेक्टरवर करण्यात आली आहे.

यंदा पावसाने उशिरा सुरुवात केल्याने खरीप पेरण्या लांबल्या होत्या. मात्र गेल्या आठवड्यात झालेल्या पावसामुळे मूग, उडीद, सोयाबीनसह इतर पिकांना नवसंजीवनी मिळाली आहे. सध्या शेतांमध्ये हिरवीगार पिके डोलताना दिसत असून चांगल्या उत्पादनाची आशा शेतकऱ्यांना लागली आहे.

मागील वर्षाच्या तुलनेत यंदा अद्याप मोठ्या प्रमाणात पाऊस झालेला नाही. त्यामुळे नदी-नाले वाहून जाण्यासारखा पाऊस झालेला नसून तलाव, बंधारे व जलाशयांतील पाणीसाठ्यातही अपेक्षित वाढ झालेली नाही. पाण्याचे जलस्रोत अजूनही चिंतेचा विषय असून आगामी काळात दमदार पावसाची गरज आहे. त्यामुळे शेतकरी व नागरिकांच्या नजरा आता परतीच्या पावसाकडे लागल्या आहेत.

६० हजार हेक्टरवर खरीप पेरणी

  • सोयाबीन : ४९ हजार ३३७ हेक्टर

  • उडीद : २ हजार ६२० हे.

  • तूर : १ हजार ५१६ हेक्टर

  • मका : ८५१ हेक्टर

  • मूग : ५२६ हेक्टर

  • नवीन ऊस लागवड : १८४ हेक्टर

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT