सटवाई मंदिरातील देवीच्या मूर्तीवरील शेंदूर काढण्यास प्रारभ file photo
धाराशिव

सटवाई मंदिरातील देवीच्या मूर्तीवरील शेंदूर काढण्यास प्रारभ

पुरातत्त्व विभागाच्या तज्ज्ञांकडून शास्त्रीय प्रक्रिया; कडक पोलिस बंदोबस्त

पुढारी वृत्तसेवा

The removal of shendur from the idol of the goddess in the Satwai temple begins

भूम, पुढारी वृत्तसेवा :

तालुक्यातील माणकेश्वर येथील प्रसिद्ध सटवाई मंदिरातील देवीच्या मूर्तीवरील शेंदूर काढण्याच्या प्रक्रियेला अखेर अधिकृत सुरुवात करण्यात आली असून छत्रपती संभाजीनगर येथील पुरातत्त्व विभागाच्या तज्ज्ञांकडून ही प्रक्रिया शास्त्रीय पद्धतीने सुरू आहे. संपूर्ण परिसरात कडक पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

मंगळवारी (दि. २८) सकाळपासून शेंदूर काढण्याचे काम प्रत्यक्ष सुरू करण्यात आले. गेल्या अनेक वर्षांपासून देवीच्या मुखवट्यावर सातत्याने लावल्या जाणाऱ्या शेंदुरामुळे मूर्तीचे मूळ स्वरूप झाकले गेल्याची भावना भाविकांमध्ये व्यक्त होत होती. मूर्ती मूळ स्वरूपात आणावी, अशी मागणी भाविकांकडून सातत्याने करण्यात येत होती.

या मागणीसाठी समाजसेवक गणेश अंधारे महाराज यांनी उपोषण केल्याने हा विषय अधिक चर्चेत आला होता. त्यानंतर गुरुवारी (दि. १६) पुरातत्त्व विभागाच्या अधिकाऱ्यांनी मंदिराला भेट देऊन प्रत्यक्ष पाहणी केली. सुरुवातीला मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष व पुजाऱ्यांनी तपासणीला विरोध दर्शविला होता. मात्र पुरातत्त्वज्ञ सागर मुंडे यांनी रासायनिक व शास्त्रीय प्रक्रियेद्वारे शेंदूर काढणे आवश्यक असल्याचे स्पष्ट केले.

छत्रपती संभाजीनगर पुरा-तत्त्व विभागाच्या सहायक संचालक जया वाहने व अधिकारी राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली अत्यंत काळजीपूर्वक ही प्रक्रिया सुरू असून संपूर्ण कामासाठी सुमारे आठ दिवसांचा कालावधी लागणार असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे. दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी उपविभागीय पोलिस अधिकारी अनिल चोरमले, परंडा येथील पोलिस निरीक्षक आसाराम चोरमले, सहायक पोलिस निरीक्षक प्रवीण शिरसाट यांच्यासह मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

सध्या मंदिराच्या गाभाऱ्यातील मुख्य मूर्तीवर काम सुरू असल्याने भाविकांसाठी देवीची प्रतिमूर्ती समोर ठेवण्यात आली असून सर्व धार्मिक पूजा-अर्चा नियमितपणे सुरू आहेत. पुरातत्त्व विभागाच्या कर्मचाऱ्यांशिवाय इतरांना मंदिरात प्रवेश बंद ठेवण्यात आला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT