सटवाई देवी मूर्तीवरील शेंदूर काढण्याचा निर्णय; १६ एप्रिलला पुरातत्त्व विभागाची कारवाई...

Dharashiv news | शेंदुराखालील मूर्ती दीर्घकाळ सुरक्षित राहून पुढील हजारो वर्षांसाठी जतन होण्यास मदत होणार आहे
सटवाई देवी मूर्तीवरील शेंदूर काढण्याचा निर्णय; १६ एप्रिलला पुरातत्त्व विभागाची कारवाई...
Published on
Updated on

भूम : तालुक्यातील माणकेश्वर येथील आराध्य दैवत श्री सटवाई देवीच्या मूर्तीवरील शेंदूर काढण्याच्या मागणीस अखेर यश आले असून, यासाठी पुरातत्त्व विभाग छत्रपती संभाजीनगर येथील तज्ञांची टीम दि. १६ एप्रिल रोजी माणकेश्वर येथे येणार आहे. याबाबतचे अधिकृत पत्र सटवाई देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष यांना देण्यात आले आहे.

मूर्तीशास्त्रानुसार देवीच्या मूर्तीवर लावण्यात आलेला शेंदूर काढून मूळ स्वरूप जतन करावे, या प्रमुख मागणीसाठी गणेश अंधारे यांनी आमरण उपोषण सुरू केले होते. त्यांच्या या आंदोलनाला गावकऱ्यांचा मोठा पाठिंबा मिळाला होता. अखेर प्रशासनाने याची दखल घेत तहसील कार्यालय भूम तसेच सहाय्यक संचालक, पुरातत्त्व विभाग छत्रपती संभाजीनगर यांच्या पत्रव्यवहारानुसार निर्णय घेण्यात आला.

या निर्णयानुसार सटवाई देवीच्या मूर्तीवरील शेंदूर काढण्याची प्रक्रिया तज्ञांकडून रासायनिक पद्धतीने करण्यात येणार आहे. यामुळे मूर्तीचे मूळ स्वरूप पुन्हा स्पष्ट होणार असून, भाविकांना देवीचे प्राचीन स्वरूपात दर्शन घेता येणार आहे. तसेच शेंदुराखालील मूर्ती दीर्घकाळ सुरक्षित राहून पुढील हजारो वर्षांसाठी जतन होण्यास मदत होणार आहे.

माणकेश्वर येथील मंदिर हे ‘महाराष्ट्र प्राचीन स्मारके व पुराण वास्तूशास्त्र विषयक स्थळे व अवशेष अधिनियम १९६०’ अंतर्गत राज्य संरक्षित स्मारक म्हणून घोषित करण्यात आले आहे. त्यामुळे या ठिकाणी कोणतीही प्रक्रिया करताना पुरातत्त्व विभागाच्या मार्गदर्शनाखालीच काम केले जाते.

दरम्यान, या निर्णयामुळे गावकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले असून, लवकरच सटवाई देवीचे मूळ स्वरूपात दर्शन मिळणार असल्याने भाविकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. सटवाई देवी ही भाविकांच्या श्रद्धेचे केंद्र असून, मूर्तीवरील शेंदूर हा अनेक वर्षांची परंपरा आणि भक्तीभावाशी जोडलेला आहे. त्यामुळे असा निर्णय घेताना देवस्थान ट्रस्ट व स्थानिक भाविकांना विश्वासात घेणे आवश्यक होते. धार्मिक भावना आणि परंपरेचा आदर राखतच मूर्तीला शेंदूर असल्याने तो तसाच राहून द्यावा, अशी आमची मागणी आहे.

बाबासाहेब अंधारे, अध्यक्ष, सटवाई देवस्थान माणकेश्वर.. “श्री सटवाई देवीच्या मूर्तीचे मूळ स्वरूप जतन करण्याच्या उद्देशाने तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली १६ एप्रिल रोजी शेंदूर काढण्याची प्रक्रिया पार पाडली जाणार आहे. ही प्रक्रिया पूर्णपणे शास्त्रीय पद्धतीने आणि भाविकांच्या भावना लक्षात घेऊन केली जाईल.”

जया वाहणे, सहाय्यक संचालक, पुरातत्त्व विभाग, छत्रपती संभाजीनगर ..

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news