उमरगा : विविध संकटे व कृषी साहित्यांच्या सततच्या भाववाढीचा सामना करीत शेतीतून उत्पन्न काढणाऱ्या शेतकऱ्यांना उत्पादन खर्चानुसार भाव मिळत नाहीत. असे असतानाही शेतकऱ्यांचा माल बाजारात येतो तेव्हा त्याचे भाव कमी होतात; परंतु त्याच मालाचा शेतकऱ्यांकडील साठा संपला की बाजारात त्याच मालाचे भाव वाढतात. याचा लाभफक्त व्यापाऱ्यांनाच होतो.
शेतकऱ्यांचा शेतमाल संपल्यावरच विकलेल्या मालाचे भाव कसे काय वाढतात, असा संतप्त सवाल शेतकऱ्यांनी उपस्थित केला आहे. त्यामुळे नैसर्गिक आपत्ती व रोगाने ग्रासल्यानंतरही शेतात घाम गाळून पिकविलेले सोयाबीन शेतकऱ्यांना मातीमोल भावाने विकावे लागले. आताच्या परिस्थितीत शेतकऱ्यांच्या घरात सोयाबीनचा दाणा शिल्लक नसताना आज बाजारात सोयाबीनला प्रति क्विंटल सात ते साडे सात हजार रुपये भाव असल्याचे दिसत आहे.
पिकवण्यासाठी शेतकऱ्यांना एकरी १२ हजार मोजावे लागत आहेत. गेल्या खरीप हंगामात सोयाबीन काढणीच्या मोसमातच अतिवृष्टीमुळे परिपक्व पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. अशाही प्रसंगी संकटाचा सामना करीत शेतकऱ्यांनी सोयाबीन पिकविला. सोयाबीन निघताच सुरुवातीला ओले सोयाबीन शेतकऱ्यांना २ हजार १०० ते ३ हजार रुपये प्रति क्विंटल भावाने विकावे लागले. त्यानंतर तेच भाव साडे चार हजारांपर्यंत पोहोचले होते.
याच दराने शेतकऱ्यांनी ८० टक्के सोयाबीन बाजारात विकले. शेतकऱ्यांकडील सोयाबीन विकल्या गेल्यानंतर आज बाजारात सोयाबीनचे भाव ७ हजार ते ७ हजार ५०० रुपयांपर्यंत वाढले आहेत. आता मोजक्याच शेतकऱ्यांकडे सोयाबीन शिल्लक आहे. हेच दर यापूर्वी बाजारात वाढले असते, तर त्याचा फायदा शेतकऱ्यांना झाला असता.
नैसर्गिक आपत्ती, अतिवृष्टी, रोगराई आणि वाढत्या उत्पादन खर्चाचा सामना करीत पिकविलेले सोयाबीन मातीमोल भावाने विक्री केले. मात्र घरात सोयाबीनचा दाणाही शिल्लक नाही. आता बाजारात त्याच सोयाबीनचा दर कसा वाढला ? पेरणी ते काढणीपर्यंत घाम शेतकऱ्याचा, पण नफा मात्र व्यापाऱ्यांचा, अशी परिस्थिती आहे.रवींद्र शिरगुरे, शेतकरी, उमरगा