Dharashiv News : भूम तालुक्यात पावसाच्या ओढीने सोयाबीन संकटात file photo
धाराशिव

Dharashiv News : भूम तालुक्यात पावसाच्या ओढीने सोयाबीन संकटात

५० हजार हेक्टरवरील पिकांना पावसाची प्रतीक्षा, पिके माना टाकू लागली

पुढारी वृत्तसेवा

Soybean in crisis due to lack of rain in Bhum taluka

भूम, पुढारी वृत्तसेवा : यंदा भूम तालुक्यात पाऊस कमी झाला असला तरी सुरुवातीच्या काळात झालेला पाऊस खरीप पिकांसाठी पोषक ठरल्याने सोयाबीनसह इतर पिकांची वाढ जोमदार झाली. मात्र, गेल्या महिनाभरापासून पावसाने ओढ दिल्याने ऐन फुलोरा व फळधारणेच्या काळात पिकांना पाण्याचा ताण जाणवू लागला आहे. दुपारच्या उन्हात सोयाबीनची पाने व माना टाकत असल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.

भूम तालुक्यात यंदा सुमारे ५० हजार हेक्टरवर सोयाबीनची पेरणी झाली आहे. सुरुवातीला पाऊस समाधानकारक राहिल्याने पिकांची वाढ चांगली झाली. पहिल्या टप्प्यातील पीक शेंगा भरण्याच्या तर दुसऱ्या टप्प्यातील पीक फुलोऱ्याच्या अवस्थेत आहे. त्यामुळे यंदा सोयाबीनचे विक्रमी उत्पादन मिळण्याची अपेक्षा होती.

मात्र, पावसाने दडी मारल्याने हे उत्पादनाचे स्वप्न धोक्यात आले आहे. हलक्या जमिनीतील पिकांना पाण्याचा ताण अधिक जाणवत असून, नदीकाठच्या भारी जमिनीतील पिके आणखी काही दिवस तग धरतील, असा अंदाज आहे.

मात्र, त्यानंतर त्यांनाही पावसाची आवश्यकता भासणार आहे. पावसाअभावी पिकांवर रोगराईचा प्रादुर्भावही वाढत असल्याचे शेतकरी सांगत आहेत. एक-दोन दिवसांत समाधानकारक पाऊस झाला नाही तर उत्पादनात मोठी घट होण्याची भीती व्यक्त होत आहे. दरम्यान, किडींच्या नियंत्रणासाठी पिवळे व निळे चिकट सापळे वापरण्याचा सल्ला कृषी विभागाने दिला आहे. पिवळे सापळे पांढरी माशी, मावा, तुडतुडे यांसारख्या किडींसाठी, तर निळे सापळे फुलकिड्यांच्या नियंत्रणासाठी उपयुक्त ठरतात.

किडींच्या नियंत्रणासाठी सापळे

पिवळे चिकट सापळे : पांढरी माशी, मावा, तुडतुडे व पाने पोखरणाऱ्या किडींचे प्रौढ पतंग यांना आकर्षित करतात, निळे चिकट सापळे : फुलकिडे (थ्रीप्स) यांच्या नियंत्रणासाठी प्रभावी ठरतात. लावण्याची पद्धत : सापळे पिकाच्या शेंड्याच्या पातळीवर किंवा पिकाच्या उंचीपेक्षा किंचित वर, जमिनीपासून सुमारे १ ते १.५ फूट उंचीवर उभे लावावेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT