School Supplies Price Hike pudhari photo
धाराशिव

School Supplies Price Hike : शालेय साहित्याच्या दरवाढीने पालकांची कसरत

शैक्षणिक खर्चात १५ ते २० टक्क्यांची वाढ; मध्यमवर्गीय कुटुंबाचे गणित बिघडले

पुढारी वृत्तसेवा

ईट : नवीन शैक्षणिक वर्ष सुरू होताच शालेय साहित्य खरेदीसाठी बाजारपेठेत लगबग वाढली आहे. वह्या, दप्तर, गणवेश, पेन आणि अन्य आवश्यक साहित्य घेण्यासाठी पालकांची दुकानदारांकडे गर्दी होत असली, तरी यंदा साहित्याच्या किमतींमध्ये १५ ते २० टक्क्यांनी वाढ झाल्याने सर्वसामान्य आणि मध्यमवर्गीय कुटुंबांचे आर्थिक गणित बिघडले आहे.

पहिली ते चौथीपर्यंतच्या विद्यार्थ्यांच्या प्राथमिक शैक्षणिक साहित्यावरच दोन ते तीन हजार रुपयांपर्यंत खर्च येत असल्याचे पालकांचे म्हणणे आहे. शासनाकडून पाठ्यपुस्तके मोफत मिळत असली तरी वह्या, दप्तर, लेखनसाहित्य आणि इतर आवश्यक वस्तूंच्या वाढलेल्या किमतींमुळे पालकांना अतिरिक्त आर्थिक भार सहन करावा लागत आहे.शाळा सुरू झाल्याने विद्यार्थ्यांमध्येही नवीन वर्ग, नवीन मित्र आणि नव्या साहित्याची उत्सुकता दिसून येत आहे.

बाजारात आकर्षक डिझाइनच्या दप्तरांसह विविध प्रकारच्या वह्या उपलब्ध झाल्या आहेत. मुलांच्या शिक्षणात कोणतीही कमतरता राहू नये, यासाठी वाढत्या खर्चानंतरही पालक साहित्य खरेदी करत आहेत. दरम्यान, डिजिटल शिक्षण आणि विद्यार्थ्यांच्या दप्तराचे ओझे कमी करण्यासाठी प्रयत्न सुरू असले तरी शैक्षणिक साहित्यावरील वाढता खर्च पालकांसाठी चिंतेचा विषय ठरत आहे. शैक्षणिक वर्ष पुढे सरकत जाईल तसा हा खर्च आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

कच्च्या मालाच्या दरवाढीचा परिणाम

युद्धजन्य परिस्थितीमुळे कच्च्या मालाच्या किंमती वाढल्याने शालेय साहित्याच्या उत्पादन खर्चात वाढ झाली आहे. त्यामुळे वह्या, दप्तर आणि इतर साहित्याच्या किमतींमध्ये १५ ते २० टक्क्यांची वाढ झाल्याचे शालेय साहित्य विक्रेते अनिल बोर्डे यांनी सांगितले.

शिक्षणासाठी खर्च अपरिहार्य

“शेतीमालाला अपेक्षित भाव मिळत नसताना महागाई, इंधन, खते आणि बियाण्यांच्या वाढत्या किमतींचा सामना करावा लागत आहे. त्यात आता शालेय साहित्यही महाग झाले आहे. तरीही मुलांच्या शिक्षणासाठी हे साहित्य घ्यावेच लागते. शासनाने अशा साहित्याच्या किमती स्थिर ठेवण्यासाठी प्रयत्न करावेत,” अशी अपेक्षा पालक उमेश टेकाळे यांनी व्यक्त केली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT