Thane School: ठाण्यात १५ जूनला शाळा सुरु; विद्यार्थ्यांसह पालकांचीही लगबग सुरू

बाजारपेठेत शालेय साहित्य खरेदीसाठी गर्दी
Thane School
Thane SchoolPudhari
Published on
Updated on

ठाणे: तब्बल दीड महिन्यांच्या उन्हाळी सुट्टीनंतर राज्यातील बहुतांश शाळांची घंटा १५ जून रोजी पुन्हा वाजणार असून विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांमध्ये नव्या शैक्षणिक वर्षाची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

गणवेश, दप्तर, वह्या, पुस्तके आणि अन्य शालेय साहित्य खरेदीसाठी बाजारपेठांमध्ये गर्दी वाढू लागली असून घराघरांत शाळेच्या तयारीची लगबग सुरू झाली आहे. पावसाळ्याच्या आगमनासह नव्या शैक्षणिक वर्षाचे स्वागत करण्यासाठी विद्यार्थी सज्ज झाले आहेत.

Thane School
NSG Operation: मिरा-भाईंदरमध्ये मोठी दुर्घटना टळली! उत्तनमध्ये सापडलेला जिवंत तोफगोळा एनएसजी, पोलिसांनी केला निकामी

प्राथमिक शिक्षण संचालक शरद गोसावी आणि माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालक डॉ. महेश पालकर यांनी संयुक्त परिपत्रकाद्वारे शाळा सुरू करण्याबाबतचा निर्णय जाहीर केला आहे. त्यानुसार ठाणे जिल्ह्यातील जवळपास ३ हजार प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळा १५ जूनपासून नियमित वेळेत सुरू होतील.

शाळा सुरू होण्यास अवघे काही दिवस उरल्याने शहरांसह ग्रामीण भागातील बाजारपेठा शालेय साहित्य खरेदीसाठी गजबजू लागल्या आहेत. वह्या, पुस्तके, दप्तर, पाण्याच्या बाटल्या, कंपास बॉक्स, रेनकोट, छत्र्या, शूज आणि गणवेश खरेदीसाठी पालकांची दुकानदारांकडे मोठी गर्दी होत आहे.

ऑनलाइन खरेदीपेक्षा प्रत्यक्ष दुकानात जाऊन साहित्य खरेदी करण्याकडे अनेक पालकांचा कल असल्याचे दिसत आहे. मुलांच्या पसंतीचे दप्तर, आकर्षक डिझाइनच्या वह्या, कार्टून पात्रांच्या पाण्याच्या बाटल्या आणि टिफिन बॉक्सना विशेष मागणी आहे.

Thane School
Bhiwandi Bribery Case: अडीच लाखांची लाच घेताना भिवंडी प्रभाग समिती सहाय्यक आयुक्त सुरेंद्र भोईरला रंगेहाथ पकडले

अनेक विद्यार्थी नवीन शैक्षणिक वर्षासाठी आपली पुस्तके कव्हर करणे, वेळापत्रक तयार करणे आणि शालेय साहित्याची जुळवाजुळव करण्यात व्यस्त आहेत.

अशा वातावरणात १५ जूनपासून राज्यातील शाळांची घंटा पुन्हा एकदा वाजणार असून विद्यार्थ्यांच्या दैनंदिन शैक्षणिक प्रवासाला नव्याने सुरुवात होणार आहे.

१ हजार ३२८ वर्गखोल्यांची रंगरंगोटी

नव्या शैक्षणिक वर्षाच्या स्वागतासाठी शाळा प्रशासनानेही तयारी पूर्ण केली आहे. जिल्हा परिषदेच्या १ हजार ३२८ वर्गखोल्यांची स्वच्छता, रंगरंगोटी, बाकांची दुरुस्ती, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, स्वच्छतागृहांची देखभाल आणि डिजिटल शिक्षण साधनांची तपासणी अशा कामांना वेग आला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news