Unseasonal Rain Lightning Strike Umarga
उमरगा: शहर व तालुक्यातील ग्रामीण भागाला सलग दुसऱ्या दिवशी मंगळवारी, (दि १३) दुपारी साडेतीनच्या सुमारास वादळी वारे आणि विजांच्या कडकडाटासह आलेल्या जोरदार पावसाने झोडपून काढले. पाऊस सुरू असतानाच चार वेगवेगळ्या ठिकाणी वीज पडून एका वासरासह ५ जनावरे ठार झाली.
शहर व तालुक्यात सकाळपासून मोठ्या प्रमाणात उष्णता होती. शहरासह तालुक्यातील मुळज, कुन्हाळी, गुरुवारी, माडजसह बहुतांश ठिकाणी मंगळवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास वादळी वारे आणि मेघगर्जेसह जोरदार अवकळी पाऊस झाला. यामुळे अनेकाच्या घरावरील पत्रे उडून गेली. पावसामुळे पानमळा, भाजीपाला, आंबा, केळी, पपई, टरबूज आदी फळबागांची मोठी हानी झाली आहे. चारा व कडब्याच्या गंजी पावसात भिजल्याने चाऱ्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. वादळी वाऱ्यासह झालेल्या अवकाळी पावसाने राष्ट्रीय महामार्गालगत असलेल्या तहसीलदार यांच्या शासकीय निवासस्थानाच्या मुख्य प्रवेशद्वारावर मोठे झाड उन्मळून पडले. त्यामुळे काही काळ वाहतूक कोंडी झाली होती.
प्रवेशद्वारावर पडलेले झाड बाजूला काढण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते. तर वीज पुरवठा खंडित झाला होता. पावसामुळे गटारी तुंबल्या आणि गटारीचे घाण पाणी रस्त्यावर आल्याने शहरातील स्वच्छता चव्हाट्यावर आली. लाखोंचा निधी खर्च होतोच कुठे असा सवाल नागरीक करत आहेत. पावसाळा सुरू होण्यासाठी अजून एक महिना शिल्लक असताना अवकाळी पावसामुळे पालिकेच्या स्वच्छता विभागाचे पितळ उघडं पडलं आहे. पावसाने गटारीचे सर्व घाण पाणी रस्त्यावर आल्याने नागरीकांचा आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. दरम्यान पावसाच्या हजेरीने वातावरणात गारवा निर्माण झाला. त्यामुळे नागरिकांची उकाडया पासून काहीशी सुटका झाली.
तालुक्यात वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस आणि धडकी भरविणाऱ्या विजांचे तांडव पाहायला मिळाले. वेगवेगळ्या चार ठिकाणी वीज पडून एका वासरासह दोन गाई, एक बैल व घोडा असे मिळून पाच जनावरे दगावली. यात मुळज येथील दत्तात्रय शिंदे यांची गाय, कुन्हाळी येथे संजीव सडघंटे यांचा घोडा, गुरुवाडी येथे उद्धव दुर्गे यांची गाय आणि वासरू तर माडज येथील सिताराम फुगटे यांच्या एका बैलाचा समावेश आहे.