

उमरगा : मराठा समाजाला आरक्षण नसल्यामुळे दाबका (ता उमरगा) येथील एका ४२ वर्षीय पदवीधर तरुणाने गळफास घेऊन जीवन संपवले . हि घटना शनिवारी (दि १९) सकाळी उघडकीस आली. प्रशांत गोविंदराव पवार ( वय ४२) असे जीवन संपवलेल्या तरुणाचे नाव आहे. दरम्यान तालुक्यात मराठा आरक्षणासाठी पदवीधर तरुणाचा बळी गेल्याने संताप व्यक्त होत आहे.
मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी केलेल्या आंदोलनानंतर आरक्षणाच्या मागणीवरून मराठा तरुण आक्रमक होताना पाहायला मिळत आहे. मात्र, असे असताना काही तरुण नैराश्यातून थेट जीवन संपवण्यासारखं टोकाचे पाऊल उचलत आहेत.
धक्कादायक म्हणजे उमरगा तालुक्यातील दाबका येथील पदवीधर प्रशांत गोविंदराव पवार(वय ४२) यांनी मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी चिट्टी लिहून स्वतःच्या शेतातील लिंबाच्या झाडाला दोरीने गळफास घेत आपले जीवन संपविल्याची घटना शनिवारी सकाळी उघडकीस आली आहे.
जीवन संपवण्यापूर्वी लिहीलेल्या चिठ्ठीतून जीवन संपवण्याचे कारण उघड झाले आहे. याची माहिती मिळताच उमरगा पोलीसांनी तत्काळ घटनास्थळी भेट देऊन पंचनामा करीत मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी उमरगा उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आला. शवविच्छेदन झाल्यानंतर शनिवारी दुपारी तीनच्या सुमारास गावातील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. प्रशांत यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, मुलगा, मुलगी, दोनभाऊ, भावजय असा परिवार आहे. या दुर्दैवी घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. या प्रकारणी पोलीस अधिक तपास करत आहे.
मराठ्यांना आरक्षण मिळत नसल्यामुळे मला काम नव्हते म्हणून मी मरतो आहे. असा वहीच्या कागदावर निळ्या शाईच्या पेनने लिहीलेल्या मजुकुराची चिट्टी प्रशांत पवार यांच्या पँटच्या खिशातून पोलिसांनी जप्त केली आहे.