

Attack on officials by sand mafia
भूम : भूम तालुक्यातील साडेसांगवी शिवारातील बाणगंगा नदीपात्रात अवैध वाळू उपसा रोखण्यासाठी गेलेल्या महसूल विभागाच्या पथकावर दगडफेक करून शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याची गंभीर घटना १ मे रोजी मध्यरात्री घडली. याप्रकरणी भूमचे नायब तहसीलदार प्रवीण जाधव यांच्या फिर्यादीवरून भूम पोलिसांनी जेसीबी चालक, टिप्पर चालक आणि सुमारे दहा अज्ञात व्यक्तींविरोधात गंभीर गुन्हे दाखल केले आहेत.
प्राप्त माहितीनुसार, नायब तहसीलदार प्रवीण दिलीप जाधव (वय ३१) हे महसूल विभागाच्या पथकासह १ मे रोजी रात्री १२:०५ ते १:०० दरम्यान साडेसांगवी येथील बाणगंगा नदीपात्रात गस्त घालत होते. दरम्यान, त्यांनी सुमारे २० ब्रास अवैध वाळू वाहून नेत असलेल्या वाहनांवर कारवाई करण्याचा प्रयत्न केला. अवैध वाळूची एकूण अंदाजित किंमत सुमारे १.२० लाख रुपये असल्याची माहिती त्यांनी दिली.
कारवाईच्या वेळी वाहनचालक आणि त्यांच्या सोबत असलेल्या सुमारे दहा अज्ञात व्यक्तींनी एकत्र येत अचानक महसूल पथकावर दगडफेक केली. या हल्ल्यात पथकाच्या सुरक्षेला धोका निर्माण झाला आणि शासकीय कारवाई मागे घ्यावी लागली. या घटनेने महसूल कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या प्रकरणात भूम पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
या घटनेविषयी नायब तहसीलदार प्रवीण जाधव यांनी सांगितले की, “रात्रीच्या वेळेस अवैध वाळू उपसा करणाऱ्यांवर कारवाईसाठी आम्ही पथकासह साडेसांगवीच्या बाणगंगा नदीपात्रात गेलो होतो. जेसीबी जवळ गेल्यावर अचानक दगडफेक सुरू झाली. या गोंधळात आरोपी जेसीबी घेऊन पसार झाले. त्या जेसीबीचा क्रमांक पोलिसांना दिला आहे.”
सध्या पोलिसांनी या प्रकरणाचा अधिक तपास सुरू केला असून आरोपींचा शोध घेण्यासाठी विशेष पथके रवाना केली आहेत. परिसरात तणावाचे वातावरण असून पोलिसांनी बंदोबस्त वाढवला आहे. प्रशासनाने नागरिकांना अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आणि सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.
भूम येथील बाणगंगा नदी पात्रात गोलेगाव, नवलगाव, साडेसांगवी , चिंचपूर, बेलगाव या भागात सर्रास वाळू माफिया वाळू उपसा करताना दिसत आहेत. साडेसांगवी येथील वाळू माफियांकडुन महसूलच्या पथकावर दगडफेक करण्यात आली.
दरम्यान, या भागात वाळू माफियांचा उपद्रव वाढत असल्याची चर्चा नागरिकांमध्ये असून महसूल कर्मचाऱ्यांच्या मौनसंमतीनेच वाळू उपसा चालत होता, अशी कुजबुज देखील सुरू आहे. त्यामुळे या प्रकरणाचा सखोल तपास होणे आवश्यक आहे, अशी मागणी स्थानिक नागरिकांतून होत आहे.