'Poster war' erupts over road work suspension
धाराशिव, पुढारी वृत्तसेवा नगरोत्थान योजनेंतर्गत मंजूर रस्त्यांना नगर विकास मंत्रालयाने स्थगिती दिल्यानंतर महायुती विरुद्ध महाविकास आघाडीत जोरदार रण पेटले आहे. आमदार राणाजगजितसिंह पाटील व खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांच्या समर्थकांमध्ये यावरून आमनेसामने संघर्ष सुरू झाला आहे. ही स्थगिती खासदार राजेनिंबाळकर यांच्यामुळेच मिळाल्याचा आरोप करत भाजप कार्यकत्यांनी जोरदार फलकबाजी केली आहे. तर त्याला प्रत्युत्तरादाखल ओमराजेंचेही कार्यकर्ते समोर आले आहेत. सरकार महायुतीचे असताना विरोधी पक्षाला का मध्ये आणत आहात, असा सवालही केला जात आहे.
शहरातील ५९ रस्ते कामांना १८ महिन्यांपूर्वी मंजुरी मिळाली होती. त्यानंतर महायुतीतील अंतर्गत कलहामुळे ही कामे वेळेत सुरू झाली नाहीत. त्यामुळे या काळात महाविकास आघाडीच्या वतीने वर्षभर आंदोलन करण्यात आले होते. त्यानंतर काही दिवसांपूर्वी या कामांना कार्यारंभ आदेश निर्गमित झाल्याचे सांगत भाजप आमदार राण- जगजितसिंह पाटील यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानणारे फलक शहरात लावले. तसेच मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत रस्त्यांच्या कामांना सुरुवात करणार असल्याचेही जाहीर केले. त्याच्याच दुसऱ्या दिवशी नगरविकास मंत्रालयाने या कामांना स्थगिती दिली. नगरविकास मंत्रालय शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांच्या अखत्यारीत आहे. महायुतीतच असलेला बेबनाव यानिमित्ताने समोर आला आहे.
हे एकीकडे असताना भाजप कार्यकर्त्यांकडून पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्यावरही सोशल मीडियातून शेरेबाजी सुरू झाली आहे. तर खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर आणि आमदार कैलास पाटील या ठाकरे गटाच्या नेत्यांवरही टीका सुरू झाली आहे. यांनीच पालकमंत्र्यांना सांगून ही स्थगिती आणल्याची चर्चा भाजप कार्यकर्त्यांनी सोशल मीडियावर सुरू केली आहे. त्यातूनच शहरात दोन दिवसांपासून फलकबाजीला ऊत आला आहे. एकमेकांची लायकी काढण्यापर्यंत टीका पोहोचल्याने सर्वसामान्यांमधून नाराजी व्यक्त होत आहे.
मागील दोन ते अडीच वर्षांपासून शहरातील रस्त्यांची चाळण झाली असल्याने तिथून मार्ग काढताना शहरवासियांना जीवघेणी कसरत करावी लागत आहे. आजपर्यंत यात दोघांचा जीव गेला आहे, तर अनेकजण जखमी झाले आहेत. वाहनांचे नुकसान होत आहे ते वे-गळेच.
एका बाजूला हे चित्र असताना पालिका निवडणुका डोळ्यासमोर ठेवून सर्वच पक्ष यावर राजकारण करत असल्याने सर्वसामान्यांमधून नाराजी व्यक्त होत आहे.
लायकी... आणि धैर्य..!
दरम्यान, भाजप कार्यकर्त्यांनी शहरातील अनेक चौकांत कामाला स्थगिती मिळवून विकृत आनंद घेत आहात, हीच का तुमची लायकी? असा सवाल विचारणारे फलक लावले आहेत. तर खासदार ओमराजे समर्थकांनी गल्लीपासून दिल्लीपर्यंत तुमचेच सरकार असताना विरोधी पक्षांवर का टीका करत आहात? तुमचे सरकार असूनही १८ महिने विलंब का लागला हे सांगण्याचे धैर्य तुमच्यात आहे का? असा सवाल विचारणारे फलक लावले आहेत.