परंडा : शहरातील किल्ला रोड परिसरातील अतिक्रमणांवर नगरपरिषदेच्या वतीने जेसीबीच्या साह्याने कारवाई करताना अधिकारी व कर्मचारी. pudhari photo
धाराशिव

Paranda Encroachment Action : परंड्यातील अतिक्रमणांवर नगर परिषदेचा हातोडा

जेसीबीच्या साह्याने कारवाई; अनेक दुकाने जमीनदोस्त, साहित्य जप्त

पुढारी वृत्तसेवा

परंडा : शहरातील सतत गजबजलेल्या किल्ला परिसराकडे जाणाऱ्या सार्वजनिक रस्ता व मोकळ्या जागेवरील अतिक्रमणांवर परंडा नगरपरिषदेच्या वतीने गुरुवारी (दि.15) मोठी कारवाई करण्यात आली. जेसीबीच्या साह्याने अतिक्रमणे हटवित अनेक दुकाने जमीनदोस्त करण्यात आली असून, बांधकामासाठी वापरण्यात आलेले पत्रे व अन्य साहित्य जप्त करण्यात आले.

नगरपरिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या स्वाक्षरीचे नोटीसपत्र संबंधित अतिक्रमणधारकांना पूर्वीच देण्यात आले होते. त्यामध्ये संबंधितांनी स्वतःहून अतिक्रमण काढून घ्यावे, अन्यथा नियोजित दिवशी प्रशासनाकडून कारवाई करून मुद्देमाल जप्त करण्यात येईल व खर्च संबंधितांकडून वसूल करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला होता.

या नोटिसा सोशल मीडियावरही व्हायरल झाल्या होत्या.आज सकाळपासून नगरपरिषदेचे अधिकारी, कर्मचारी व मोठा पोलिस बंदोबस्त घटनास्थळी दाखल झाला. किल्ला रोडवरील चिंचेच्या झाडाखालील काही व्यापाऱ्यांनी स्वतःहून अतिक्रमणे हटविली. त्यामुळे परिसराने मोकळा श्वास घेतल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली. मात्र काही व्यापाऱ्यांनी अतिक्रमण न काढल्याने नगरपरिषदेने जेसीबीच्या साह्याने थेट कारवाई करत अतिक्रमणांवर हातोडा चालविला.

या कारवाईमुळे शहरातील इतर अतिक्रमणधारकांचेही धाबे दणाणले आहेत. दरम्यान, परंडा शहरातील विविध रस्ते व चौकांमध्येही अतिक्रमणे झाली असून, त्यामुळे वाहतूक व रहदारीस अडथळा निर्माण होत असल्याची चर्चा सुरू आहे. ही अतिक्रमणेही हटवावीत, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT