Paranda city shut down to demand action against chief officer
परंडा, पुढारी वृत्तसेवा : नगरपालिकेच्या मुख्याधिकारी मनीषा वडेपल्ली यांच्या प्रशासकीय काळातील कारभाराची चौकशी करून त्यांना निलंबित करण्याच्या मागणीसाठी गुरुवारी शहरात बंद पाळण्यात आला. सर्व पक्षीय भ्रष्टाचार विरोधी कृती समितीच्या वतीने आयोजित या बंदला परंडा शहरातील नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
भ्रष्टाचार विरोधी कृती समितीने तहसीलदारांमार्फत मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य यांना दिलेल्या निवेदनात मुख्याधिकारी मनीषा वडेपल्ली यांच्यावर अनेक गंभीर आरोप केले आहेत. त्यात प्रामुख्याने संतश्रेष्ठ एकनाथ महाराज यांच्या पालखी मार्गाचा रस्ता फोडून वारकऱ्यांना मुरुमावरून चालण्यास भाग पाडल्याचा आणि नगर परिषदेकडे शौचालयांची मागणी करूनही ती उपलब्ध करून न दिल्याचा आरोप केला आहे. शहरातील काशिमबाग येथे सार्वजनिक शौचालय बांधूनही मागील चार वर्षांपासून ते बंद असल्याचा मुद्दाही निवेदनात नमूद करण्यात आला आहे.
या सर्व प्रकरणांची सखोल उच्चस्तरीय चौकशी करून तत्काळ कारवाई करण्याची मागणी समितीने केली आहे. याशिवाय इतर कामांची यादी जोडली आहे. माजी मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे, उपमुख्यमंत्री तथा नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे, विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर आणि जिल्हाधिकारी यांनाही निवेदनाची प्रत पाठवण्यात आली आहे.
या निवेदनावर रणजीत ज्ञानेश्वर पाटील, राहुल मारुतीराव बनसोडे, ड. नुरोड्डीन चौधरी, शब्बीरखा पठाण, जमीनखा पठाण, अॅड. संदीप पाटील, इस्माईल कुरेशी, रईस मुजावर, डॉ. अब्बास मुजावर, श्रीहरी नाईकवडी, सत्तर पठाण, रमेश सिंह परदेशी, घनश्याम शिंदे, कुणाल जाधव, समीर पठाण, नशीर शहा वर्फिवाले, खय्युम तुटके, नंदू शिंदे, रईस मुजावर आदींसह भ्रष्टाचार विरोधी कृती समितीच्या अनेक पदाधिकाऱ्यांच्या स्वाक्षऱ्या असून, यावेळी मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते. या बंदमुळे परंडा शहरात शांततापूर्ण वातावरणात आंदोलनाची नोंद झाली असून, प्रशासन यावर काय भूमिका घेते, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.