

Coconuts have become expensive, one for Rs. 30!
भीमाशंकर वाघमारे
धाराशिव : कोणत्याही शुभकार्याचा अविभाज्य भाग असलेले श्रीफळ अर्थात नारळ सध्या सर्वसामान्य ग्राहकांच्या खिशाला चटके देत आहे. गेल्या सहा महिन्यांपासून नारळाच्या दरात सातत्याने वाढ होत असून, सध्या बाजारात एक नारळ तब्बल ३० रुपयांना विकला जात आहे. दर्जानुसार काही ठिकाणी ४० रुपयांपर्यंत दर पोहोचले आहेत.
सण, पूजा, लग्नकार्ये, गृहप्रवेश यासारख्या प्रत्येक मंगल कार्यात मशुभशकुनफमानला जाणारा नारळ सामान्यतः १५ ते २० रुपये दरम्यान मिळायचा. मात्र सध्या त्याच्या किमतीने थेट दुप्पट उडी घेतली आहे. व्यापाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, केरळ, तामिळनाडू व कर्नाटक राज्यांतील हवामान बदल, उत्पादनात घट आणि वाहतूक खर्च वाढल्यामुळे दर वाढले आहेत. सध्या धाराशिवच्या बाजारात एका नारळाची किंमत ३० रुपयांपर्यंत पोहोचली आहे, तर वाळलेल्या खोबऱ्याचे दर ३५० रुपये प्रति किलोच्या पुढे गेले आहेत.
दिवाळीपर्यंत हे दर ४०० रुपये किलोच्या पुढे जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सुमारे सहा महिन्यांपूर्वीपर्यंत बाजारात नारळ १५ ते २० रुपये दराने सहज उपलब्ध होता. परंतु अलीकडे दर हळूहळू चढत गेले आणि आता ३० रुपयांवर पोहोचले आहेत. काही भागांमध्ये दर्जानुसार नारळ ३५ ते ४० रुपयांपर्यंत विकले जात असल्याचे चित्र आहे.
या दरवाढीमागे अनेक कारणे दिली जात आहेत. दक्षिण भारतीय हॉटेल्सची वाढती संख्या आणि शहाळे पिण्याचे वाढलेले प्रमाण यामुळे पुरवठा आणि मागणी यात व्यस्त प्रमाण निर्माण झाले आहे. नारळाला असलेली मागणी वाढतच असून त्याचा ताण पुरवठ्यावर येत आहे. दुसरीकडे, नारळ उत्पादक राज्यांमधील अस्मानी संकट (उदा. अवकाळी पाऊस, रोगराई, कीटकांचा प्रादुर्भाव) यामुळे नारळाच्या बागांना मोठा फटका बसला आहे.