Over two lakh devotees have darshan of Tulja Bhavani Mata
तुळजापूर : संजय कुलकर्णी महाराष्ट्राची कुलस्वामिनी श्री तुळजाभवानी मातेच्या शारदीय नवरात्र महोत्सवातील सहाव्या माळेला शनिवारी दुपारी चार वाजेपर्यंत दोन लाखांहून अधिक भाविकांनी मातेच्या दर्शनाचा लाभघेतला. सकाळी सहा ते १० वाजेपर्यंत पंचामृत अभिषेक, नित्योपचार पूजा पार पडल्यानंतर मातेची मुरली अलंकार महापूजा बांधण्यात आली. या विशेष अवतार पूजेचे लाखो भाविकांनी दर्शन घेतले.
दरम्यान, मध्यरात्रीपासून पावसाची रिपरिप सुरू आहे. भाविकांनी पावसाचा अंदाज घेऊन रेनकोट, छत्र्या सोबतच ठेवल्या. भरपावसातही कुलदेवतेच्या दर्शनाला भाविकांची मोठ्या प्रमाणात हजेरी लागत आहे.
आज दिवसभर सूर्यदर्शन झाले नाही. पाचव्या माळेपासून तुळजापूर शहरातील सर्व रस्ते भाविकांच्या खचाखच गर्दीने फुलून गेलेले असतात. मात्र, आज याउलट परिस्थिती पाहावयास मिळाली. भाविकांची गर्दी पावसामुळे अस्ताव्यस्त झाली होती. डोक्यावर पावसाचा मारा आणि मुखी 'आई राजा उदो, उदो'चा जयघोष करीत लाखो भाविकांनी देवीचे दर्शन घेतले. पावसातच ओल्या कपड्यात आबालवृद्ध, महिला दर्शन रांगेत उभ्या होत्या.
श्री तुळजाभवानी मातेने शारदीय नवरात्रातील नऊ दिवसांत दैत्यांशी घनघोर युद्ध करून त्यांचा वध केल्यानंतर सर्व देवी-देवता दैत्यांच्या त्रासातून मुक्त झाले. त्याप्रसंगी आनंदित होऊन भगवान श्रीकृष्णांनी स्वतः कडील मुरली मातेस अर्पण केली. याप्रसंगाची आठवण म्हणून मुरली अलंकार विशेष अवतार महापूजा बांधली जाते. मातेने मुरली वाजविल्यानंतर सर्व भयभीत देव स्वर्गप्राप्तीचा अनुभव घेऊ लागले, अशी आख्यायिका आहे.