भीमाशंकर वाघमारे
धाराशिव : ज्या शरद पवारांनी डॉ. पद्मसिंह पाटील यांना ४० वर्षे मंत्रीपदाच्या माध्यमातून सत्तेत संधी दिली. आ. राणाजगजितसिंह पाटील यांना विधीमंडळाचे सदस्य नसताना सात खात्यांचे राज्यमंत्री केले. त्या आ. पाटील यांनी पवारांच्या अडचणीच्या काळात त्यांना धोका दिला, अशी नेहमी टीका करणारे खा. ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनीही उध्दव ठाकरे यांच्या शिवसेनेसोबत फारकत घेत शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश जवळपास निश्चित केल्याचे स्पष्ट होऊ लागले आहे.
उध्दव ठाकरे यांचे अत्यंत निष्ठावंत म्हणून ओळख असलेले खा. राजेनिंबाळकर यांचे पक्षांतर झालेच तर पक्षासाठी धक्कादायक असेल. यामुळे जिल्ह्यातील राजकीय समीकरणेही बदलणार असून याचे दूरगामी परिणाम होणार आहेत.
खा. राजेनिंबाळकर यांचे मूळ राजकारण किंवा राजकीय प्रवास पाहिला तर त्यांचे पक्षीय कमी पण डॉ. पद्मसिंह पाटील तसेच आ. राणाजगजितसिंह पाटील यांच्या विरोधावरच राजकीय यश मिळाले आहे. किंवा पाटील कुटुंबियाचा विरोध हाच त्यांचा राजकीय अजेंडा राहिला आहे. त्या त्या वेळी आलेल्या लाटा तसेच राजकीय स्थितीचा त्यांना फायदा होत गेला आहे.
२००९ मध्ये ते पहिल्यांदा पवनराजे खून प्रकरणात सहानुभूती मिळवित विधानसभेत विजयी झाले. तर २०१४ मध्ये पराभव झाला. पुढे २०१९ मध्ये ते मोदी सरकारच्या लाटेत १ लाख २७ हजार मतांनी लोकसभेत विजयी झाले. तर २०२४ मध्ये महाविकास आघाडीच्या लाटेत तब्बल ३ लाख २९ हजार मतांनी लोकसभेत विजयी झाले.
खा. राजेनिंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली नुकत्याच नगरपालिका तसेच जिल्हा परिषद निवडणुका पक्षाने लढल्या. पण दोन्ही निवडणुकांत पक्षाला नगण्य यश मिळाले. त्यातच भाजप आ. राणाजगजितसिंह पाटील यांचे सत्तेत महत्व वाढले आहे. विरोधी पक्षाचा खासदार असल्याने सत्ताधार विकास निधीत कोंडी करीत आहेत, ‘डीपीसी’चा निधी मिळत नाही, विकासकामे करणार कशी असा आरोप सातत्याने ते करीत होते. त्यातच अधेमधे एकनाथ शिंदेंकडून ऑपरेशन टायगरची हूल उठत होती. त्यातच खा. ओमराजेंचे नाव असायचे. त्या प्रत्येक वेळी ओमराजे ‘मी ठाकरेंचा निष्ठावान शिवसैनिक आहे. मला अडचणीच्या काळात साथ देणार्या या पक्षासोबत कधीही गद्दारी करणार नाही’, असे ठामपणे सांगायचे.
पण काळ आणि परिस्थिती हातात नसते. काही निर्णय भविष्याचा विचार करुन घ्यावे लागतात, असे आता त्यांचे समर्थकही सोशल मिडियावर पोस्ट टाकत आहेत. भाजप आ. राणाजगजितसिंह यांच्या ताब्यात जिल्हा परिषद, बहुतांश नगरपालिका असल्याने ते अधिक ताकदवर होत असल्याने भविष्यातील निवडणुका कठीण असू शकतात, असा विचार या पक्षांतराबाबत झालेला असू शकतो, असे त्यांचे समर्थक सांगत आहेत. पालिका निवडणुकीत शिवसेनेच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवाराचा झालेला पराभवही त्यांच्या जिव्हारी लागल्याचे त्यांचे निकटवर्तीय सांगतात.
आता सोबत कुणाची?
खा. ओमराजे यांनी पक्षांतराबाबत अजूनही समोर येऊन भमिका स्पष्ट केलेली नाही. दोन दिवसांपासून सोशल मिडियावर सुरु असलेल्या बातम्यांमुळे पक्षांतराच्या चर्चा रंगल्या आहेत. असे असले तरी त्यांच्यासोबत कोण कोण आहे, हे अजून स्पष्ट झालेले नाही. जिल्ह्यात धाराशिवचे आ. कैलास पाटील आणि उमरग्याचे आ. प्रवीण स्वामी हे दोन विधानसभा सदस्य आहेत. तर प्रत्येक तालुक्यात महत्वाचे पदाधिकारी आहेत. हे सर्वजण उध्दव ठाकरेंसोबत थांबणार की ओमराजेंना साथ देणार याचे उत्तर पुढील काही दिवसांत मिळणार आहे.