एनसीएमसी कार्ड नसले तरी प्रवास भाड्यात सवलत कायम pudhari photo
धाराशिव

NCMC card : एनसीएमसी कार्ड नसले तरी प्रवास भाड्यात सवलत कायम

धाराशिव : एसटीचे विभाग नियंत्रक पाटील यांची माहिती

पुढारी वृत्तसेवा

धाराशिव : एसटी प्रवासासाठी एनसीएमसी (नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड) अनिवार्य असल्याच्या अफवा सध्या सोशल मीडियावर पसरत असल्या तरी त्या पूर्णपणे निराधार असल्याचे महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या धाराशिव विभागीय कार्यालयाने स्पष्ट केले आहे. कार्ड नसले तरी प्रवाशांना पूर्वीप्रमाणे सर्व सवलती मिळत राहणार असल्याने नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन करण्यात आले आहे.

विभाग नियंत्रक अजय पाटील यांनी सांगितले की, एनसीएमसी कार्ड ही सुविधा सध्या ऐच्छिक असून ती प्रवाशांच्या सोयीसाठी सुरू करण्यात आली आहे. भविष्यात डिजिटल व्यवहार सुलभ व्हावेत, प्रवास अधिक सुसूत्र व्हावा आणि एकाच कार्डवर विविध सुविधा मिळाव्यात, हा या उपक्रमामागील उद्देश आहे. मात्र, यामुळे विद्यमान सवलतींवर कोणताही परिणाम होणार नाही.

एसटीच्या विविध सवलत योजनांचा लाभ घेण्यासाठी प्रवाशांकडे वैध ओळखपत्र असणे आवश्यक आहे. आधार कार्ड, मतदान ओळखपत्र आदींच्या आधारे अमृत ज्येष्ठ नागरिक योजना, महिला सन्मान योजना तसेच इतर सवलतींचा लाभ सुरूच राहील, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

जिल्ह्यात सध्या 117 नोंदणीकृत केंद्रांवर एनसीएमसी नोंदणी प्रक्रिया सुरू असून ती तत्काळ बंद होणार नाही. गर्दी टाळून संयमाने नोंदणी करावी, असेही आवाहन करण्यात आले आहे. तसेच नोंदणी करताना केवळ निश्चित शुल्कच भरावे व अतिरिक्त पैसे मागितल्यास तत्काळ तक्रार करावी, असेही प्रशासनाने सांगितले आहे. अफवांपासून दूर राहून केवळ अधिकृत माहितीवर विश्वास ठेवावा, असे आवाहन महामंडळाने केले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT