नळदुर्ग भुईकोट किल्ल्यासाठी सव्वा सात कोटी pudhari photo
धाराशिव

Naldurg Fort : नळदुर्ग भुईकोट किल्ल्यासाठी सव्वा सात कोटी

संवर्धन कामांना मंजुरी : किल्ल्याचे रूप पालटणार

पुढारी वृत्तसेवा

धाराशिव : राज्यातील सर्वात मोठा भुईकोट किल्ला अशी ख्याती असलेल्या आणि मोठा ऐतिहासिक वारसा लाभलेल्या नळदुर्ग किल्ल्याच्या जतन आणि संवर्धनासाठी राज्य शासनाने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. ‌‘नळदुर्ग किल्ला संवर्धन आणि स्थळ व्यवस्थापन आराखडा‌’ या आराखड्यानंतर्गत पहिल्या टप्प्यातील कामांसाठी तब्बल 7 कोटी 18 लाख 91 हजार 791 रुपयांच्या निधीला मंजुरी देण्यात आली आहे.

कामाची निविदा प्रक्रियाही नुकतीच सुरू झाली आहे. त्यामुळे धाराशिव जिल्ह्याच्या पर्यटन व्यवसायाचा मानबिंदू असलेल्या ऐतिहासिक नळदुर्ग किल्ल्याचे रूप आता पालटणार असल्याचा विश्वास आ. राणाजगजितसिंह पाटील यांनी व्यक्त केला आहे.

शासनाच्या पुरातत्त्व व वस्तुसंग्रहालय संचालनालयाच्या छत्रपती संभाजीनगर विभागीय कार्यालयामार्फत हे काम पूर्ण केले जाणार आहे. या प्रकल्पामुळे दुर्लक्षित राहिलेल्या नळदुर्ग किल्ल्याला पुन्हा एकदा गतवैभव लाभणार आहे. नळदुर्ग किल्ल्याच्या या पहिल्या टप्प्यातील कामात अनेक महत्त्वाच्या बाबींचा समावेश करण्यात आला आहे. यात प्रामुख्याने तटबंदीचे संवर्धन हाती घेण्यात येणार आहे.

किल्ल्याची ऐतिहासिक तटबंदी अनेक ठिकाणी कमकुवत झाली आहे, त्याचे शास्त्रोक्त पद्धतीने संवर्धन केले जाणार आहे. किल्ल्यातील झुडपे आणि राडारोडाही हटविण्यात येणार आहे. किल्ल्याच्या परिसरात आणि तटबंदीवर वाढलेली अनावश्यक झुडपे तसेच साचलेला राडारोडा पूर्णपणे साफ करण्यावर विशेष लक्ष देण्यात येणार आहे. देशभरातून तुळजाभवानी मातेच्या दर्शनासाठी येणारे लाखो भाविक आवर्जून या भुईकोट किल्ल्याला भेट देतात.

आंध्रप्रदेश आणि कर्नाटक राज्यातून शिर्डीला दर्शनासाठी जाणारे भाविक आणि पर्यटकही अलीकडच्या काळात मोठ्या संख्येने किल्ला पाहण्यासाठी येत आहेत. पर्यटकांच्या सोयीसाठी आणि किल्ल्याचे सौंदर्य वाढवण्यासाठी स्थळ व्यवस्थापन आराखड्याची अंमलबजावणी पहिल्या टप्प्यात हाती घेण्यात आली असल्याची माहिती आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी दिली आहे.

पुरातत्व विभागाच्या नियमांनुसार आणि तज्ज्ञ वास्तुविशारदांच्या मार्गदर्शनाखाली हे काम पूर्ण करण्याचे कंत्राटदाराला बंधनकारक असणार आहे. दीड वर्षाच्या आत पर्यटकांना नळदर्ग किल्ल्याचे पालटलेले रूप पाहायला मिळणार असल्याचा विश्वास आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी व्यक्त केला आहे. या संवर्धन प्रकल्पामुळे नळदुर्ग किल्ला पर्यटनाच्या नकाशावर अधिक ठळकपणे येईल आणि स्थानिक पर्यटनाला मोठी चालना मिळणार आहे, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT