Ajinkyatara Fort: अजिंक्यतारा किल्ल्याला मिळणार नवसंजीवनी

जतन, संवर्धनाची मुख्यमंत्र्यांची घोषणा : स्वराज्याच्या अभेद्य ताऱ्याला नवी झळाळी
Ajinkyatara Fort
Ajinkyatara FortPudhari
Published on
Updated on

सातारा : स्वराज्याच्या वैभवाचे प्रतीक असलेल्या अजिंक्यतारा किल्ल्याचे जतन, संवर्धन आणि पर्यटन विकासासाठी मोठ्या प्रमाणावर कामे हाती घेण्यात येणार असल्याची घोषणा राज्य सरकारने केली आहे. राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अजिंक्यतारा किल्ल्याचे जतन आणि संवर्धन करण्यात येणार असल्याचे जाहीर केले आहे. या घोषणेनंतर साताऱ्याच्या ऐतिहासिक वारशाला नवसंजीवनी मिळणार आहे. अजिंक्यतारा किल्ल्याचा सर्वांगिण विकास करण्यासाठी लागणाऱ्या 134.8 कोटींचा विकास आराखड्यानुसार निधी मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

अजिंक्यतारा किल्ल्यावर करण्यात येणाऱ्या 134.8 कोटींच्या कामांचा सविस्तर आराखडा सार्वजनिक बांधकाम विभागाने (पूर्व) तयार केला आहे. या किल्ल्याचे ऐतिहासिक स्वरूप जतन करत पर्यटकांसाठी आवश्यक पायाभूत सुविधा निर्माण करण्यावर भर देण्यात आला आहे. या अंतर्गत किल्ल्यावरील तलावांचे संवर्धन आणि दुरुस्ती करण्यात येणार आहे. किल्ल्यावर असलेले ऐतिहासिक तलाव पाण्याचे स्रोत असले तरी किल्ल्याच्या स्थापत्य आणि जलव्यवस्थेचे महत्त्वाचे प्रतीक आहेत. त्यामुळे या तलावांची स्वच्छता, मजबुतीकरण आणि संवर्धन करुन त्यांचे मूळ स्वरूप जपले जाणार आहे.

किल्ल्यावर येणाऱ्या पर्यटकांची संख्या लक्षात घेता ट्रेकिंग मार्गांचे सुशोभिकरण आणि पादचारी मार्ग विकसित करण्याचे काम हाती घेण्यात येणार आहे. किल्ल्यावर चढण्यासाठी सुरक्षित आणि आकर्षक पाथवे तयार करण्यात येणार असून ठिकठिकाणी दिशादर्शक आणि माहिती फलक उभारले जाणार आहेत. यामुळे पर्यटकांना किल्ल्याचा इतिहास आणि विविध स्थळांची माहिती सुलभपणे मिळू शकणार आहे.

पर्यटकांच्या सोयीसाठी किल्ल्यावर स्वच्छतागृहे, बसण्याची व्यवस्था आणि गझेबो उभारण्यात येणार आहेत. तसेच लोटस तलावांचे संवर्धन करुन त्याभोवती पादचारी मार्ग तयार करण्यात येणार आहे. किल्ल्याच्या परिसरात लँडस्केपिंग करुन हिरवाई वाढवण्याची योजना आहे. पयटकांना विश्रांतीसाठी उन्नत आणि सामान्य बैठक व्यवस्था करण्यात येणार असून संपूर्ण परिसरात आधुनिक विद्युतीकरणाची सुविधा उपलब्ध करुन दिली जाणार आहे.

किल्ल्याच्या ऐतिहासिक आणि सांस्कृतिक महत्त्वाला अधोरेखित करण्यासाठी राजसदर परिसर विकसित करण्याचे कामही प्रस्तावित आहे. यासोबतच किल्ल्यावरील तटबंदीचे संवर्धन व पुनर्रसंचयित करण्यासाठी रॉक अँकरिंग ट्रिटमेंटचा वापर केला जाणार आहे. किल्ल्याच्या संरचनेचे दीर्घकालीन संरक्षण करण्यासाठी ही प्रक्रिया महत्त्वाची मानली जाते. प्रवेशद्वाराजवळील बुर्ज आणि अवशेषांजवळील खडकांचे मजबुतीकरण करण्यात येणार असून बेसाल्ट दगडी स्मारकांची दुरुस्तीही करण्यात येणार आहे.

पर्यटकांसाठी आकर्षण वाढवण्याच्या दृष्टीने किल्ल्यावर ॲम्फीथिएटरचे दगडी बांधकाम आणि सुमारे चार हजार लोकांच्या क्षमते इतके लँडस्केपिंग करण्यात येणार आहे. याठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रम, ऐतिहासिक सादरीकरणे आणि विविध उपक्रम आयोजित करता येणार आहेत. तसेच किल्ल्यावर झुलता पादचारी पूल उभारण्याची योजनाही आहे, ज्यामुळे पर्यटकांना किल्ल्याच्या विविध भागांचे दर्शन अधिक रोमांचक पद्धतीने घेता येणार आहे.

किल्ल्यावर बुर्ज क्रमांक तीनचे दगडी बांधकाम, आरसीसी रिटेनिंग स्ट्रक्चर अणि नैसर्गिक दगडी फरशी बसवण्याची कामेही करण्यात येणार आहेत. याशिवाय किल्ल्यावर निरीक्षण मनोरा उभारण्याचे नियोजन असून या मनोऱ्यावरून सातारा शहर आणि परिसरातील निसर्गरम्य दृश्य पाहण्याची संधी पर्यटकांना मिळणार आहे. या मनोऱ्याचे बांधकाम दगडी पद्धतीने करण्यात येणार असून त्यासाठी आरसीसी रिटेनिंग स्ट्रकचर आणि मजबूत पाया तयार केला जाणार आहे. इतिहासप्रेमींसाठी विशेष आकर्षण म्हणून किल्ल्यावर ऐतिहासिक घटनांचे अंतर्गत ऑडिओ-व्हिज्युअल कक्ष उभारण्यात येणार आहे.

सार्वजनिक बांधकाम विभागाने 134.8 कोटींचा हा विकास आराखडा तयार केला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनात अजिंक्यतारा किल्ल्याच्या जतन व संवर्धनाची घोषणा केल्याने निधी मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.सातारा पालिकेनेही किल्ल्याच्या विकासासाठी मोठ्या प्रमाणावर कामे केली आहेत.

राज्याच्या अर्थसंकल्पात सातारा जिल्ह्यासाठी पर्यटन, ऐतिहासिक वारसा संवर्धन, आरोग्य आणि कृषी क्षेत्रासाठी भरीव तरतुदी करण्यात आल्या आहेत. अजिंक्यतारा किल्ला, वासोटा किल्ला तसेच संगम माहुली येथील ऐतिहासिक स्थळांच्या जतनामुळे जिल्ह्याच्या पर्यटनाला मोठी चालना मिळेल. कटगुण व नायगाव येथे उभारण्यात येणाऱ्या स्मारकांमुळे सामाजिक व ऐतिहासिक वारसा जपण्यास मदत होईल. तसेच शेतकरी कर्जमाफी योजनेमुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे. या सर्व योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी जिल्हा प्रशासन कटिबद्ध आहे.
-संतोष पाटील, जिल्हाधिकारी, सातारा

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news