Make history by planting 15 lakh trees on a single day: Collector Pujar
धाराशिव, पुढारी वृत्तसेवा :
राज्यात या पावसाळ्यात दहा कोटी वृक्ष लागवड करण्यात येणार आहे. तर जिल्ह्यात ५० लक्ष वृक्षलागवड करण्यासाठी प्रत्येकाने आपले कर्तव्य पार पाडावे. येत्या १९ जुलै रोजी एकाच दिवशी जिल्ह्यात १५ लक्ष वृक्ष लागवड करून धाराशिवकरांनी नवा आदर्श निर्माण करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी कीर्तिकिरण पुजार यांनी केले.
जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात वृक्षारोपण व वृक्ष संवर्धन मोहिमेच्या अनुषंगाने जिल्ह्यातील स्वस्त धान्य दुकानदार, बँक अधिकारी, महाविद्यालयाचे प्राचार्य व मुख्याध्यापक यांच्या आयोजित सभेत पुजार बोलत होते. यावेळी उपजिल्हाधिकारी (रोहयो) प्रवीण धरमकर, विभागीय वन अधिकारी (सामाजिक वनीकरण) व्ही. के करे, जिल्हा पुरवठा अधिकारी स्वाती शेंडे, शिक्षणाधिकारी (माध्यमिक) सुधा साळुंखे व शिक्षणाधिकारी (प्राथमिक) अशोक पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.
पुजार म्हणाले, की ज्या ठिकाणी पाण्याचे स्रोत आहे, अशा ठिकाणची निवड वृक्ष लागवडीसाठी करण्यात येणार आहे. १९ जुलै रोजी घनवन वृक्ष लागवडीतून १५ लक्ष वृक्ष लागवड करण्यात येणार आहे.
प्रत्येकाने नेमून दिलेल्या ठिकाणी वृक्ष लागवडीसाठी उपस्थित राहावे. १५ लक्ष वृक्ष लागवडीच्या समन्वयासाठी नोडल अधिकारी नियुक्त केले आहेत. धरमकर म्हणाले, की जिल्ह्यात ६२२ ग्रामपंचायती आणि दहा नगरपालिका, नगरपंचायती आहेत.
दोनशे ग्रामपंचायतीची नोंदणी घनवन वृक्ष लागवडीसाठी करण्यात आली आहे. १९ जुलै रोजी १५ लक्ष वृक्ष लागवड करण्यात येणार आहे. यामध्ये सर्वांनी सहभागी व्हायचे आहे. त्यांना संमतीपत्र द्यावे लागणार आहे. सर्वांच्या सहभागातून घनवन वृक्ष लागवड करण्यात येणार आहे.