

तुळजापूर : येथील श्री तुळजाभवानी मंदिर परिसरात पान, तंबाखू , गुटखा खाऊन मंदिरात प्रवेश करणार्या कर्मचारी, पुजारी, सेवेकरी यांना भविष्यात मंदिर प्रवेशबंदी करण्यात येईल असा सज्जड इशारा मंदिराचे विश्वस्त तथा तहसीलदार अरविंद बोळंगे यांनी एका आदेशाद्वारे नुकताच दिला आहे.
सध्या मंदिरात देवी दर्शनाला जाणार्या भाविकांकडून विडी, सिगारेट, तंबाखू, गुटखा मंदिराच्या प्रवेशद्वारावरच काढून घेतल्यानंतर त्यांना मंदिरात प्रवेश दिला जातो. मात्र हा नियम मंदिर कर्मचारी, सेवेकरी, पुजारी यांनाही लागू करण्यात यावा, अशा सूचना विविध ठिकाणच्या भाविकांनी संस्थांनकडे केल्या होत्या,त्याची गंभीर दखल घेवून मंदिर प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे.
सामान्य भाविकांनी प्रशासनाला सूचना दिल्याने तुळजापूर तीर्थक्षेत्राची सर्वदूर बदनामी होत असल्याची जाणीव प्रशासनाला झाल्याने नशापान करणार्यांना चाप लावण्याचा निर्णय घेण्यात आला. याहीपलीकडे जावून या आदेशाचे उल्लंघन झाल्यास संबंधित व्यक्तीला मंदिर प्रवेशबंदी करण्यात येईल असेही आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे.