Mahayuti's victorious opening in Tuljapur BJP's Dr. Anuja Kadam wins unopposed
तुळजापूर, पुढारी वृत्तसेवा: नगर परिषदेच्या प्रभाग क्रमांक ३ मधून भारतीय जनता पार्टीच्या उमेदवार डॉ. अनुजा अजित कदम यांच्या विरोधातील सर्व उमेदवारांनी अर्ज मागे घेतल्यामुळे त्यांची बिनविरोध निवड झाली. भाजप शिवसेना शिंदे गट व राष्ट्रवादी अजित पवार गट या पक्षांच्या नेत्यांनी त्यांचे अभिनंदन केले.
तुळजाभवानी देवीचे भोपे पुजारी अजित कदम यांच्या त्या कन्या असून उच्चशिक्षित डॉक्टर असणाऱ्या अनुजा अजित कदम या प्रथमच नगरसेवक झाल्या आहेत. त्यांचे वडील अजित कदम हे नगराध्यक्ष राहिले असून आजोबा किसनराव कदम हे पंधरा वर्षे नगर परिषदेचे सदस्य राहिले आहेत. त्यांची आजी लतिकाबाई कदम यानी देखील नगरसेवक म्हणून यापूर्वी शहराचे ्रतिनिधित्व केले आहे.
नगरसेवक पदाचा मोठा वारसा असणारे अजित कदम यांनी शहराच्या राजकारणात नुकताच भाजप नेते विनोद गंगणे व आ. राणा जगजितसिंह पाटील यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला होता. त्यांच्या विरोधातील मधुकर शेळके या उमेदवाराला एबी फॉर्म न मिळाल्यामुळे त्याने माघार घेण्याचा निर्णय घेतला आहे. भाजपाचे नेते विनोद गंगणे, तुळजाभवानी भोपे पुजारी मंडळाचे अध्यक्ष अमरराजे कदम, पुजारी सचिन कदम, लखन पेंदे, आणि कदम परिवाराच्या वतीने तिचा गुलालाच्या जल्लोषात सत्कार पार पडला.
तुळजापूर शहराच्या विकासासाठी विशेषतः भाविकांच्या सुविधा होण्यासाठी आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्या नेतृत्वाखाली होत असलेल्या विकास आराखड्याला आपण पाठबळ देऊ, नागरिकांच्या चांगल्या सूचना प्रशासनापर्यंत पोहोचवू. - डॉ अनुजा अजित कदम, विजयी उमेदवार