

धाराशिव : जिल्ह्यात एक दोन अपवाद वगळता सर्वत्र महाविकास आघाडी तसेच महायुतीच्या एकीचे तीनतेरा झाले आहेत. सर्वांनी स्वतंत्र अर्ज दाखल केल्याने अर्ज माघारीच्या दिवसापर्यंत सर्व पक्षांना कसरत तसेच तडजोडी कराव्या लागणार आहेत.
धाराशिव : नगराध्यक्षपदासाठी भाजप व शिवसेना (युबीटी) यांच्यात थेट लढत होत असली तरी या दोन्ही प्रमुख पक्षांना त्यांचेच मित्रपक्ष असलेल्या दोन्ही राष्ट्रवादी अडचणीत आणणार आहेत. कमी जागा दिल्याचे निमित्त करून 'मविआ' शरद पवारांची राष्ट्रवादी बाहेर पडली आहे. तर महायुतीतून अजित पवारांच्या राष्ट्रवादीने स्वतंत्र अर्ज दाखल केला आहे. या दोन्ही पक्षांनी आपापला उमेदवार दिल्याने दोन्ही प्रमुख पक्षांची डोकेदुखी वाढली आहे.
उमरगा पालिकेसाठी महाविकास आघाडी तसेच महायुती असे चित्र सध्या तरी नसून सहाही पक्षांनी आपापले स्वतंत्र अर्ज दाखल केले आहेत. त्यामुळे शहरातील राजकारण भविष्यात काय आकार घेणार याकडे धुरिणांच्या नजरा लागल्या आहेत. येथील नगराध्यक्षपद खुले असल्याने इच्छुकांची मांदियाळी आहे.
भूम येथे शिवसेनेची (शिंदे) आलमप्रभू शहर विकास आघाडीच्या विरोधात भाजप, राष्ट्रवादी (दोन्ही), काँग्रेस हे पक्ष एकत्र आले आहेत.
त्यांनी जनशक्ती पॅनेलच्या माध्यमातून येथे ताकद पणाला लावली आहे. त्यामुळे या निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
परंडा भाजप, दोन्ही राष्ट्रवादी तसेच काँग्रेसने या पालिकेतही एकत्र येत जनशक्ती पॅनेल उभे करून शिवसेना (शिंदे) पक्षाच्या विरोधात आघाडी तयार केली आहे. भूम व परंडा तालुक्यात आ. तानाजी सावंत यांच्या वर्चस्वाला शह देण्यासाठी दोन्ही तालुक्यांत हे राजकारण होत असल्याचे मानले जाते.
कळंब : पालिकेत अपेक्षेप्रमाणे महायुती व महाविकास आघाडीतील केवळ दोन्ही राष्ट्रवादी वेगळे होऊन एकत्र लढणार असल्याने येथे तिरंगी लढती होत आहेत. नगराध्यक्षपदासाठी इच्छुकांची संख्या अधिक असल्याने हा प्रकार येथेही घडला आहे.
मुरुम : एकेकाळी बालेकिल्ल्याच्या या शहरात यंदा महायुतीत सध्या तरी बिनसल्याचे ६ चित्र आहे. अर्थात येथील राजकीय स्थिती पाहता तिन्ही पक्ष एकत्र लढणार का हे पाहणे रंजक असेल. येथे काँग्रेस व शिवसेना काँग्रेसच्या (युबीटी) यांच्यात आघाडी झाली असून शरद पवार राष्ट्रवादीचे येथे अस्तित्व अगदीच अल्प आहे.
नळदुर्ग : पालिकेत सगळेच पक्ष स्वतंत्र लढत आहेत. केवळ काँग्रेस व शिवसेना (युबीटी) यांच्यात आघाडी आहे. येथे एमआयएमचाही उमेदवार असल्याने निवडणूक रंगतदार होईल.
तुळजापूर : पालिकेत दोन्ही बाजूंनी समान ताकद आहे. महायुती अभेद्य राहिली आहे. तर महाविकास आघाडीही शाबूत आहे. काही अपक्षांचे अर्ज वैध ठरले तर नगराध्यक्षपदाची निवडणूक चुरशीची होऊ शकते. अर्थात हे सर्व आजपर्यंतच्या घडामोडीचे विश्लेषण आहे. अर्ज माघारीनंतर नेमके चित्र स्पष्ट होणार आहे.