लोहारा : रब्बी संकटात; लोहाऱ्यात अद्याप पेरणी थंडच आहे. पेरणी झालेले क्षेत्रही अनिश्‍चिततेच्‍या गर्तेत आहे.  pudhari photo
धाराशिव

Dharashiv Agriculture : केवळ ५ हजार हेक्टरवर रब्बीचा पेरा; अनिश्चिततेचे सावट

लोहारा : ओढे, नद्या कोरड्या; पाण्यासह पशुधनाच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर

पुढारी वृत्तसेवा

विक्रांत संगशेट्टी

लोहारा : खरीप हंगामाने हात दिला नाही... सोयाबीनच्या उत्पादनाने अपेक्षाभंग केला... आणि आता रब्बी हंगामाकडून असलेली शेवटची आशाही मावळू लागली आहे! पावसाच्या प्रत्येक सरीची आतुरतेने वाट पाहणाऱ्या लोहारा शहर व तालुक्यातील शेतकऱ्यांच्या पदरी यंदा केवळ निराशाच पडत आहे. परतीच्या पावसाने पूर्णपणे पाठ फिरवल्याने जमिनीतील ओल संपली आणि पाण्याचे स्रोत आटले.

परिणामी, रब्बीच्या पेरणीचे गणितच कोलमडले आहे. तालुक्यात रब्बीचे सरासरी क्षेत्र जवळपास २८ हजार हेक्टरच्या जवळपास असताना, आजवर केवळ ५ ते ६ हजार हेक्टर क्षेत्रावर रब्बीची पेरणी झाली असून, हे प्रमाण अवघे १८ ते २१ टक्के आहे. त्यामुळे संपूर्ण तालुका आता भीषण दुष्काळसदृश परिस्थितीच्या विळख्यात सापडला आहे.

लोहारा तालुक्यात यंदा पावसाळ्यात मोठा खंड पडल्याने सरासरीच्या केवळ ५० ते ५१ टक्के अत्यल्प पाऊस झाला. खरीप पिकांच्या वाढीसाठी आवश्यक असणारा दमदार पाऊस न झाल्याने सोयाबीनसह अन्य पिकांच्या उत्पादनात मोठी घट झाली आणि अनेक शेतकऱ्यांच्या हातात अपेक्षित उत्पादन आले नाही.

खरीप हंगामातील या नुकसानीतून सावरण्याची सर्व आशा रब्बी हंगामावर होती. या भागात रब्बी हंगामात प्रामुख्याने ज्वारी, हरभरा, करडई आणि ऊस ही पिके घेतली जातात. गणेशोत्सव, दसरा आणि ऑक्टोबर महिन्यात परतीचा पाऊस होईल, अशी अपेक्षा होती. मात्र, पावसाने पाठ फिरवली आणि नोव्हेंबर महिनाही कोरडाच गेल्याने शेतकऱ्यांच्या आशा मावळल्या आहेत.

तालुक्यातील ओढे, नाले आणि नद्या कोरड्या पडत चालले असून, विहिरी आणि कूपनलिकांनी तळ गाठला आहे. रब्बी ज्वारीचा पेरा घटणार असल्याने आणि रानातील गवत करपल्याने पशुधनाच्या चाऱ्याचा प्रश्न अत्यंत गंभीर बनला आहे.

जनावरांना जगवायचे कसे, असा प्रश्न पशुपालकांसमोर उभा ठाकला आहे. खरीप हंगामातील आर्थिक नुकसान, रब्बी पेरणीसाठी जमिनीत ओलाव्याचा अभाव, सिंचनासाठी पाण्याची टंचाई आणि पशुधनाच्या चाऱ्याचा प्रश्न अशा चौफेर संकटांनी शेतकऱ्यांना घेरले आहे. या दुष्काळसदृश परिस्थितीची शासनाने तातडीने दखल घेऊन चारा व पाण्याचे नियोजन करावे, अशी मागणी शेतकऱ्यांतून होत आहे.

खरिपात सोयाबीनने पूर्णपणे निराशा केली, त्यामुळे रब्बीच्या हंगामाकडून मोठ्या अपेक्षा होत्या. मशागत करून ठेवली आहे, पण परतीचा पाऊस न झाल्याने जमिनीत अजिबात ओल नाही. विहिरीचे पाणीही कमी झाले आहे, त्यामुळे पेरणी करावी की नाही, असा प्रश्न पडला आहे."
प्रशांत लांडगे, शेतकरी, लोहारा
पावसाअभावी ओढे आणि नाले कोरडेच आहेत. थोडेफार पाणी शिल्लक आहे, ते जर रब्बीच्या पिकांना दिले, तर उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्याची आणि जनावरांच्या चाऱ्याची मोठी टंचाई निर्माण होईल. बियाणे आणि खतांचा खर्च कसा भागवायचा, हीच मोठी चिंता आहे.
भगवान बिराजदार, शेतकरी, लोहारा

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT