Kojagiri Pournima for two days in Tuljapur
तुळजापूर : पुढारी वृत्तसेवा
महाराष्ट्राची कुलस्वामिनी श्री तुळजाभवानी मातेच्या सीमोल्लंघन सोहळ्यानंतर येत्या सोमवार व मंगळवारी असे दोन दिवस कोजागिरी पौर्णिमेचा सोहळा साजरा होणार आहे. भाविकांच्या वाढत्या गर्दीच्या पार्श्वभूमीवर सोलापूर-तुळजापूर-सोलापूर हा नेहमीचा ४५ कि.मी.चा रस्ता सर्वच वाहनांच्या वाहतुकीसाठी शनिवारी (४ ऑक्टोबर) दुपारी ४ | वाजल्यापासूनच प्रशासनाने बंद केला आहे.
दरम्यान, दोन पौर्णिमेच्या धर्तीवर तुळजापुरात होणारी भाविकांची गर्दी लक्षात घेऊन जिल्हा प्रशासनाने सर्वच यंत्रणांना सतर्कतेचे आदेश दिले आहेत. परतीच्या पावसाने जोरदार तडाखा दिला. नवरात्र उत्सवात पाऊस, पूर होताच. आता कोजागिरी पौर्णिमेचा सोहळा तरी उत्साहात व जल्लोषात साजरा व्हावा, यासाठी सर्वजण मातेची प्रार्थना करत आहेत. लाखो श्रद्धाळू तुळजापूरवारी पूर्ण करण्यासाठी शेकडो मैल अंतर अनवाणी पार करीत तुळजापूरच्या वाटेवर आहेत.
गुरुवारी सीमोल्लंघन सोहळ्यानंतर सुरू झालेली तुळजाभवानी मातेची पाच दिवसांची श्रम निद्रा मंगळवारी पहाटे (दि. ७) संपणार आहे. मूर्तीची सिंहासनावर प्रतिष्ठापना झाल्यानंतर चरणतीर्थ, काकडा आरती पार पडून मूर्तीला पहाटे आणि सकाळी असे दोनवेळा पंचामृत अभिषेक होणार आहेत.