

भूम : तुळजापूरचे आमदार राणा जगजितसिंह पाटील यांनी भूम व परंडा तालुक्यात अतिवृष्टीग्रस्त भागात सलग तीन दौरे केले आहेत. हे दौरे केवळ शेतकऱ्यांच्या मदतीसाठी नसून, स्थानिक राजकीय समीकरणे बदलण्याचा प्रयत्न असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगत आहे.
अतिवृष्टीमुळे भूम व परंडा तालुक्यातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर आमदार राणा पाटील यांनी तहसील कार्यालयात प्रशासनासोबत आढावा बैठक घेतली, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्यासोबत पाहणी केली. नुकतेच त्यांनी पुन्हा तहसील कार्यालयात अधिकाऱ्यांसोबत पूरग्रस्त भागातील नुकसानी व मदतीवर चर्चा करून पत्रकार परिषद घेतली.
दरम्यान, या दौऱ्यांमागे राजकीय उद्देश असल्याची कुजबुज सुरू आहे. माजी आमदार राहुल भैया मोटे यांनी अलीकडेच अजित पवार गटात प्रवेश केला आहे. तर मंत्री तानाजी सावंत यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत पूरग्रस्त भागांचा दौरा व कीटवाटप कार्यक्रम केले. मात्र दोन्ही नेत्यांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक घेतलेली नसल्याचे बोलले जाते. त्यामुळे राणा पाटील यांच्या हालचालींमुळे खासदार ओमराजे निंबाळकर व मंत्री तानाजी सावंत यांना राजकीय शह मिळत असल्याचे चर्चेत आहे.
राजकीय विश्लेषकांचे मत आहे की, आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती व नगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राणा पाटील भूम-परंडा भागात आपले वर्चस्व मजबूत करण्याचा प्रयत्न करत आहेत. विशेष म्हणजे, जिल्हा परिषद अध्यक्षपद सर्वसाधारण महिलेसाठी आरक्षित झाल्यानंतर राणा पाटील यांचे परंडा मतदारसंघातील दौरे वाढलेले दिसत आहेत.
बैठकीदरम्यान आमदार राणा पाटील यांनी सांगितले की, “पूरामध्ये वाहून गेलेल्या पशुधनाबाबत शेतकऱ्यांना विविध संस्थांच्या माध्यमातून मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार.” सध्या शिंदे गट, उभारटा गट आणि भाजपमध्ये प्रत्येकी दोन-दोन गट सक्रीय असल्याने, या हालचालींचा परिणाम आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवर कोणाच्या फायद्यात जातो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.