दुचाकीची डिकी फोडून पोलिसाचे चार लाख लंपास pudhari photo
धाराशिव

Bhoom theft case : दुचाकीची डिकी फोडून पोलिसाचे चार लाख लंपास

भरदिवसा भूम शहरात चोरी; परिसरात खळबळ

पुढारी वृत्तसेवा

भूम : शहरात भरदिवसा घडलेल्या धाडसी चोरीच्या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. वाशी पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले पोलीस कर्मचारी अर्जुन सुंदरराव मार्कड (रा. सोनगिरी) यांची दुचाकी फोडून अज्ञात चोरट्यांनी तब्बल चार लाख रुपयांची रोकड लंपास केल्याची घटना समोर आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अर्जुन मार्कड यांनी स्टेट बँकेतून सोनं तारण ठेवून चार लाख रुपयांचे कर्ज घेतले होते. ही रक्कम घेऊन ते पत्नीसमवेत दुचाकीने प्रवास करत असताना अज्ञात चोरट्यांनी त्यांची दुचाकी प्रथम पंचर केली. त्यानंतर काही अंतरावर त्यांच्या पत्नीच्या अंगावर संशयास्पद पदार्थ फवारण्यात आल्याने तिला अचानक तीव्र खाज येऊ लागली.

या प्रकारामुळे घाबरलेल्या दाम्पत्याने तात्काळ भूम ग्रामीण रुग्णालय गाठले. उपचारासाठी रुग्णालयात गेल्यानंतर दुचाकी (क्र. एमएच 33 ई 2057) बाहेर पार्क करण्यात आली होती. याच संधीचा फायदा घेत चोरट्यांनी अवघ्या काही मिनिटांत दुचाकीच्या डिक्कीचे लॉक स्क्रू ड्रायव्हरच्या सहाय्याने तोडून त्यातील चार लाख रुपयांची रोकड चोरून नेली.

संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद

ही संपूर्ण घटना परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून, फुटेजच्या आधारे आरोपींचा शोध सुरू करण्यात आला आहे. भूम ग्रामीण रुग्णालय परिसरात भूम पोलीसांकडून तपासाची चक्रे वेगाने फिरवली जात आहेत. घटनेच्या अनुषंगाने ग्रामीण रुग्णालयातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात येत असून संबंधित मार्गावर कॅमेरा आहे का याची पडताळणी सुरू आहे. या प्रकरणात गुन्हा दाखल झाला आहे. तपास गतीने सुरु केला आहे, अशी माहिती पोलीस उपनिरीक्षक संजय झराड यांनी दिली.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT