ईट : गेल्या वर्षीच्या अतिवृष्टीचा फटका यंदा रब्बी हंगामाला बसला असून ज्वारी पेरणी उशिरा झाल्याने कडब्याचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घटले आहे. परिणामी, सध्या कडब्याचे दर गगनाला भिडले असून प्रति शेकडा तब्बल 3 हजार ते 5 हजार रुपयांपर्यंत पोहोचले आहेत. मागणी वाढली असली तरी कडबा उपलब्ध होत नसल्याने पशुपालक आणि शेतकरी मोठ्या आर्थिक अडचणीत सापडले आहेत.
वेळेवर वापसा न मिळाल्यामुळे ज्वारीचे लागवड क्षेत्र घटले आणि त्याचा थेट परिणाम कडब्याच्या उत्पादनावर झाला. परगाव व इतर जिल्ह्यांतूनही मागणी वाढल्याने दर आणखी वाढले आहेत. त्यामुळे कडबा खरेदी करणे अनेकांसाठी अशक्य होत चालले आहे. या पार्श्वभूमीवर शेतकरी कडब्याला पर्याय म्हणून मक्याच्या मुरघासाकडे वळताना दिसत आहेत.
हिरवा चारा म्हणून मका पिकवून त्याची कुट्टी करून मुरघास तयार केला जात आहे. स्वतःचा मका असल्यास 3 ते 4 रुपये किलो दराने मुरघास मिळतो, तर पूर्ण तयार मुरघास 7 ते 8 रुपये किलो दराने विकला जात आहे. हा पर्याय स्वस्त व पोषक ठरत असून जनावरांच्या दूध उत्पादनातही वाढ होत असल्याचे पशुपालक सांगतात.ईटसह परिसरात दुग्ध व्यवसाय मोठ्या प्रमाणात केला जात असल्याने चाऱ्याची गरजही तेवढीच मोठी आहे.
मात्र सध्या हिरव्या चाऱ्याचे दरही प्रचंड वाढले आहेत. एका गुठ्ठ्याला 2 हजार ते 2 हजार 500 रुपये दर मिळत असून दुभत्या जनावरांसाठी दररोज आठ ते दहा पेंड्यांची गरज भासत आहे. त्यामुळे एका जनावरामागे दिवसाला सुमारे साडेतीनशे रुपये खर्च येत आहे. मिळणारे दूध आणि होणारा खर्च याचा मेळ बसत नसल्याने पशुपालक आर्थिकदृष्ट्या अडचणीत आले आहेत.
दरम्यान, वाढत्या खर्चामुळे अनेक पशुपालक दुभती जनावरे सांभाळणेही कठीण झाल्याचे चित्र आहे. उत्पादन खर्च आणि उत्पन्न याचा ताळमेळ न बसल्याने काही जण जनावरे बाजारात विक्रीसाठी आणत आहेत. भाकड जनावरे सांभाळणे तर अधिकच कठीण बनले असून मोठ्या प्रमाणात जनावरे विक्रीसाठी बाजारात येत असल्याचे दिसून येत आहे.
सध्या कडब्याचे दर परवडत नाहीत आणि उपलब्धताही नाही. ज्वारी पेरणी कमी झाल्याने ही परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे आम्ही मका मुरघासाचा पर्याय स्वीकारला असून तो अधिक फायदेशीर ठरत आहे.दादासाहेब खांडेकर, दूध उत्पादक शेतकरी, ईट.