

Soybean prices have fallen in the market.
हिंगोली, पुढारी वृत्तसेवा :
शासनाने सोयाबीनला ५ हजार ३०० रुपये प्रतिक्विंटलचा हमी दर जाहीर केला आहे. शासकीय खरेदी केंद्र देखील सुरू झाले आहेत. परंतु, बाजारात मात्र सोयाबीनचे दर पडलेलेच असल्याचे समोर आले आहे. सोमवारी येथील कृषी उत्पन्न समितीच्या मोंढ्यात सोयाबीनला ४ हजार २०० ते ४ हजार ६०० पर्यंतचा दर मिळाला. हमी दरा-पेक्षा खासगी बाजारात मिळणारा दर हा ८०० ते १००० रुपये कमी असल्याने उत्पादक शेतकरी हवालदिल झाला आहे.
जिल्ह्यात यंदा २ लाख २५ हजार हेक्टर क्षेत्रावर सोयाबीनची पेरणी झाली होती. परंतु, अतिवृष्टीमुळे सोयाबीनचा उतारा गतवर्षीच्या तुलनेत निम्म्यावर आला. एकरी तीन ते चार क्विंटलचा उतारा आल्याने सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांचा लागवड खर्चही देखील निघाला नाही. एकीकडे उत्पादन घटले तर दुसरीकडे बाजारात दर कोसळल्याने सोयाबीन उत्पादक शेतकरी दुहेरी संकटात सापडला. दिवाळीनंतर मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी आपल्याकडे असलेले सोयाबीन खासगी व्यापाऱ्यांना विकले. ३ हजार ५०० ते ४ हजार १०० रूपये प्रतिक्विंटलच्या दराने शेतकऱ्यांना आपल्या मालाची विक्री करावी लागली.
मागील दोन आठवड्यापासून नाफेडचे खरेदी केंद्र सुरू झाले आहे. मोठे शेतकरी नाफेडला आपला माल विक्री करीत आहेत. परंतु, छोट्या शेतकऱ्यांना मात्र नाईलाजाने आपला माल येथील बाजार समितीच्या मोंढ्यातच विकासा लागत आहे.
सोयाबीनची हमी दराने खरेदी सुरू झाल्याने मोंढ्यात सोयाबीनचे दर वाढतील अशी अपेक्षा होती. परंतु, मागील पंधरा दिवसांपासून येथील मोंढ्यात सोयाबीनचे दर स्थिर आहेत. सोमवारी सोयाबीनला सरासरी ४ हजार ३०० रूपये दर मिळाला. सोयाबीनचा हंगाम सुरू होऊन दोन महिने उलटले तरी अद्यापही सोयाबीनला समाधानकारक दर मिळत नसल्यामुळे सोयाबीन उत्पादक शेतकरी अडचणीत सापडले आहेत.
मालाच्या थप्प्या कायम
येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मोंढ्यात व्यापाऱ्यांच्या मालाच्या थप्प्या लिलाव शेडमध्ये कायम आहेत. नियमानुसार दोन ते तीन दिवसात व्यापाऱ्यांनी आपला माल शेडमधून बाहेर काढणे बंधनकारक असताना देखील येथील मोंढ्यात मात्र व्यापाऱ्यांच्या थप्प्या कायम दिसून येतात. याकडे बाजार समिती प्रशासन व प्रशासक सोयीस्कर दुर्लक्ष करीत असल्याने शेतकऱ्यांमधून नाराजी व्यक्त केली जात आहे.