Farmers are aggressive against the arbitrariness of windmill companies
धाराशिव, पुढारी वृत्तसेवा : धाराशिव जिल्ह्यात पवनचक्की उभारणी करणाऱ्या कंपन्यांच्या मनमानी कारभाराविरोधात धूम आणि वाशी परिसरातील संतप्त शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शुक्रवारी रास्ता रोको आंदोलन केले. जिल्हाधिकारी कार्यालयात घुसून अनेकांनी घोषणाबाजी केली.
तर काही महिलांनी आत्महत्येचा इशारा दिला. शेतकऱ्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष होत असल्याने उपोषणकर्त्यांची प्रकृती खालावली असल्याचा आरोप करीत शुक्रवारी शेतकरी आक्रमक झाले. शिवसेनेचे (ठाकरे गट) आ. कैलास पाटील यांनीही कार्यकर्त्यांसह या आंदोलनात सहभागी होत शेतकऱ्यांच्या मागण्यांना पाठिंबा दिला. यावेळी त्यांच्या नेतृत्वाखाली रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.
मागील पाच दिवसांपासून हे आंदोलन सुरू आहे. दरम्यान, तोडगा न निघाल्यामुळे शेतकरी आक्रमक झाले आहेत. त्यांनी रस्ता रोको करत जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेश द्वारावर आंदोलन केले. काही महिला नियोजन विभागाच्या इमारतीवर चढून आत्महत्या करण्याचा इशारा दिला. यावेळी पोलिसांची मोठी धावपळ उडाली. तिघांची प्रकृती बिघडल्याने आंदोलनाची तीव्रता वाढली आहे. भूम, वाशी परिसरातील पवनचक्की कंपन्यांच्या विरोधात हे आंदोलन सुरू आहे.
प्रमुख मागण्या
पवनचक्कीसाठी वापरल्या जाणाऱ्या जमिनीचा योग्य आणि समान मोबदला मिळावा. सध्या काही शेतकऱ्यांना हजारो रुपये तर काहींना लाखो रुपये मोबदला दिला जात आहे. शेतकऱ्यांसोबत इंग्रजी भाषेत केलेले करारनामे त्यांना उपलब्ध करून दिलेले नाहीत. अनेक ठिकाणी शेतकऱ्यांच्या सह्या मजकूर नसताना घेण्यात आल्या आहेत. शेतकऱ्यांची संमती नसतानाही पोलिस बळ, दलाल आणि गुंडांच्या मदतीने टॉवर उभारले जात आहेत. यामुळे शेतकऱ्यांवर अन्याय होत आहे.