Dolby : आगामी सण, उत्सवात डॉल्बीला परवानगी नको
Dolby should not be allowed in upcoming festivals and celebrations
धाराशिव, पुढारी वृत्तसेवा आगामी काळात शहरात साजरे होणारे विविध सण, उत्सव शांततेत पार पडावेत, तसेच यामुळे सामान्य नागरिकांना कोणताही त्रास होऊ नये, यासाठी सद्भावना मंचने पोलीस अधीक्षकांना निवेदन दिले आहे. डॉल्बीमुक्तीसह रस्त्यांवर खड्डेविरहित मंडप असावेत, अशी मागणी यात केली आहे.
या निवेदनात उच्च आणि सर्वोच्च न्यायालयाच्या निकालांचा संदर्भ देत विविध समस्या आणि त्यावर उपाययोजना सूचवण्यात आल्या आहेत. निवेदनात म्हटले आहे, की उत्सवादरम्यान रस्त्यांवर उभारल्या जाणाऱ्या तात्पुरत्या संरचनांमुळे वाहतूक कोंडी होते आणि अपघातांचा धोका वाढतो, ज्यामुळे लहान मुले, वृद्ध आणि महिलांना त्रास होतो. उच्च न्यायालयाने सार्वजनिक रस्त्यांवर अशा संरचना उभारण्यास मनाई केली आहे.
रस्त्यांवर कोणत्याही प्रकारच्या संरचना उभारण्यास प्रतिबंध, वाहतूक व्यवस्थापनासाठी विशेष पथके असावीत. तात्पुरत्या शेडमुळे रस्त्यांना खड्डे पडून नुकसान होते, ज्यामुळे दीर्घकाळ वाहतूक समस्या निर्माण होतात. सर्वोच्च न्यायालयाने सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान टाळण्यासाठी कठोर निर्देश दिले आहेत. त्याचे पालन व्हावे. रस्त्यांवर शेड्स उभारण्यास मनाई, मोकळ्या मैदानांचा वापर करण्यास प्रोत्साहन द्या. मोठ्या आवाजात स्पीकर आणि ध्वनिक्षेपकांच्या वापरामुळे लहान मुले, वृद्ध, आजारी व्यक्ती आणि विद्यार्थ्यांना त्रास होतो.
सर्वोच्च न्यायालयाने डेसिबल मर्यादा आणि वेळेचे बंधन घालून दिले आहे (रात्री १० नंतर बंदी), त्याचे पालन करावे. ४८ मरवणुकांमध्ये डीजेच्या कर्कश आवाजामुळे वृद्ध आणि हृदयरुग्णांना गंभीर धोका निर्माण होतो. उच्च न्यायालयाने डीजे वाजवण्यावर बंदी घातली आहे. या बाबींचे पालन न करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी केली आहे. या निवेदनावर धर्मवीर कदम, सिकंदर पटेल, शाजिउद्दीन शेख यांची स्वाक्षरी आहे.

