Employee stole gold worth crore, incident in Naldurg
नळदुर्ग, पुढारी वृत्तसेवा : येथील दिशा नागरी सहकारी पतसंस्थेच्या शाखेतून शाखेतीलच कर्मचाऱ्याने कट रचून सुमारे दोन कोटी ६३ लाख ६३ हजार २७२ रुपयेचे तारण ठेवलेले सोने चोरुन नेल्याची घटना दि. ७ नोव्हेंबरच्या सांयकाळी सहा वाजले पासून ते दि. ८ नोव्हेंबरच्या रात्री दोन वाजाच्या दरम्यान घडली.
या घटनेमुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे. दरम्यान घटनेची फिर्याद शाखाधिकारी उमेश भानुदास जाधव यांनी पोलिस ठाण्यात दिल्याने पतसंस्थेचे कर्मचारी राहुल राजेंद्र जाधव यासह इतर तीन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नळदुर्गच्या इतिहासातील ही सर्वात मोठी चोरी असून यामुळे सर्वत्र खळबळ माजली आहे.
या बाबत पोलिस सूत्रांकडून समजलेली माहिती अशी की, दिशा नागरी सहकारी पतसंस्थेतील लिपीक पदावर काम करीत असलेला कर्मचारी राहल राजेंद्र जाधव याने संगनमत करुन त्याच्या पदाचा दुरुपयोग करुन त्याचा मित्र सुशील राठोड यासह इतर दोघे जण आपसात कट रचून दि. ७ नोव्हेंबर च्या सायंकाळी सहाच्या ते दि. ८ नोव्हेंबर च्या रात्री दोन वाजे पर्यंत शाखेच्या मुख्य शटरचे लॉक चावीने उघडून आत प्रवेश केला.
आत मधील तिजोरीतील एकूण दोन त्रेसष्ठ कर्जदाराचे दोन कोटी ६१ लाख ४२ हजार सत्तावीस रुपयेचे कर्ज रक्कमेसाठी तारण ठेवलेले चार किलो ७६२ ग्रॅम ६७९ मिली वजनाचे सोन्याचे दागिने व रोख रक्कम दोन लाख २३ हजार ७३७ रुपये पैकी दोन लाख २१ हजार २४५ रुपये असे एकूण दोन कोटी त्रेसष्ठ लाख त्रेसष्ठ हजार २७२ रुपयेचा मुददेमाल चोरुन नेला आहे. दरम्यान उमेश जाधव यांच्या फिर्यादीवरुन राहूल राजेंद्र जाधव, सुशील राठोड व इतर दोन अनोळखी असे चार जणांवर गुन्हा दाखल झाला आहे.
पोलिस अधिक्षक रितू खोखर यांच्या आदेशाने स्थानिक गुन्हा शाखेचे पोलिस निरीक्षक इज्जपवार पुढील तपास करीत आहेत. या घटनेमुळे जिल्हा पोलिस अधिक्षक रितू खोकर, उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. निलेश देशमुख, गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक विनोद इज्जपवार, नळदुर्ग पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक सचिन यादव, सहाय्यक पोलिस निरीक्षक नंदकिशोर सोळंखे, आनंद कांगुने, पोलिस उपनिरीक्षक संतोष गिते, ईश्वर नांगरे यांनी घटना स्थळी भेट देवून पहाणी केली.