भूम : भूम- बोरिवली या चालत्या एसटी बसचे चाक निखळल्याने मोठा अपघात होण्याची शक्यता होती. मात्र, चालकाने प्रसंगावधान दाखवत बस नियंत्रणात आणली. चालकाच्या प्रसंगावधानामुळे ८५ प्रवाशांचे प्राण वाचले. ही घटना गुरूवारी (दि.१२) सकाळी ८ च्या सुमारास पुणे-सोलापूर हायवेवरील खडकी गावाजवळ घडली.
भूम आगारातून भूम-बोरिवली एसटी बस (क्र. एमएच २० बीएल २१०२) गुरूवारी सकाळी ८ वाजता पुण्याकडे जात निघाली होती. यादरम्यान ती पुणे-सोलापूर हायवेवरील भिगवणजवळील खडकी गावाजवळ आली असता या बसचे एक चाक निखळून पडले. यामुळे बस अनियंत्रित होण्याची शक्यता होती. मात्र, चालकाने प्रसंगावधान दाखवत बस थांबवल्याने ८५ प्रवाशांचे प्राण वाचले. योगायोगाने आजच परिवहन मंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री धाराशिवमध्ये असताना ही घटना घडली.