Dharashiv Kalamb simple Wedding Simple Marriage Ceremony
कळंब: पुण्यातील वैष्णवी हागवणे मृत्यू प्रकरणानंतर मराठा समाज आक्रमक झाला आहे. समाजाने लग्न समारंभाची आचार संहिताच लागू केली आहे, त्याचे आचरण कळंब येथील प्रतिष्ठित व्यापारी दिलीप टोणगे यांनी करून समाजासमोर एक आदर्श ठेवला आहे. मुलाच्या लग्नात या आचार संहितेचे पालन करण्याचे त्यांनी ठरवले. आणि उच्चशिक्षित जोडप्याचा विवाह १०० नातवाईकांच्या उपस्थितीत नोंदणी पद्धतीने पुणे येथे आज (दि.६) करण्यात आला.
मराठा समाजाने घालून दिलेल्या आचार संहितेचे राज्यातील हे पहिलेच लग्न असेल. या लग्नात आचार संहिते चे पालन करण्यात आले. कळंब येथील प्रतिष्ठित व्यापारी दिलीप टोणगे यांचे चिरंजीव ॲड. प्रफुल्ल व हरिदास पवार पाटील यांची कन्या ऋचा हिचा हळदी समारंभ पुणे येथे अगदी मोजक्याच मंडळींच्या उपस्थितीत संपन्न झाला. हे दोघे ही उच्च शिक्षित असून, त्यांनी मोजक्याच नातेवाईकांच्या समवेत नोंदणी पद्धतीने विवाह शुक्रवारी केला.
या विवाह सोहळ्यामध्ये ना घोडा, ना वाजंत्री , ना फटाक्यांची आतषबाजी, फक्त नवरदेवाला फेटा बांधण्यात आला होता. आहेरांची, कपड्यांची कसलीही रेलचेल नव्हती. मोजक्याच पाहुण्यांना निमंत्रण व रूचकर भोजनाची मेजवानी. कळंब येथील माजी नगरसेवक सतीश टोणगे यांच्या पुतण्याचा हा विवाह आदर्श घेण्या सारखा पार पडला. या नोंदणी विवाह सोहळ्याप्रसंगी प्रभारी विवाह अधिकारी चंद्रकांत हाळे, नितीन जाधव, अविनाश गायकवाड यांनी कायदेशीर शपथ देऊन विवाह झाल्याचे जाहीर केले.
मराठा समाजाने विवाहाच्या संदर्भात आचारसंहिता लागू केल्यापासून मनात विचार घोळत होता मी मुला मुलीशी चर्चा केली दोन्ही कुटूंबियानी सल्ला मसलत करून आम्ही छोटेखानी विवाह करण्याचा ठरवले व तो आज थाटामाटात संपन्न झाला. अगदी पन्नास हजारात हा विवाह संपन्न झाला.- दिलीप टोणगे, (वर पिता)