येरमाळा : सोलापूर ते धुळे राष्ट्रीय महामार्ग रिफ्लेक्टर नसल्याने रात्रीच्या प्रवासासाठी धोकादायक ठरत आहे.  pudhari photo
धाराशिव

Dharashiv News : धुळे-सोलापूर महामार्गावर जीव मुठीत धरून प्रवास

मूलभूत सुविधांचा अभाव; नागरिकांचा संताप, वाहनचालकांची होतेयं गैरसोय

पुढारी वृत्तसेवा

बाळासाहेब जाधवर

रत्नापूर : मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र आणि उत्तर महाराष्ट्राला जोडणारा धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्ग हा व्यापार, उद्योग, शेतीमाल वाहतूक आणि प्रवासी दळणवळणासाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जातो.

या महामार्गामुळे धुळे, मालेगाव, छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, धाराशिव आणि सोलापूर या जिल्ह्यांतील संपर्क सुलभ झाला आहे. मात्र, इतक्या महत्त्वाच्या महामार्गावर सुरक्षित वाहतुकीसाठी आवश्यक सुविधा अनेक ठिकाणी अपुऱ्या असल्याचे दिसून येत आहे. संबंधित कंपनीकडून टोल वसूल केला जात असला तरी रस्त्यावर रिप्लेक्टर, पथदिवे आणि स्पष्ट सूचना फलकांची कमतरता असल्याची तक्रार वाहनचालकांकडून होत आहे.

विशेषतः रात्रीच्या वेळी वाहनचालकांना रस्त्याचा अंदाज घेणे कठीण जाते. काही ठिकाणी सुरू असलेल्या अपूर्ण कामांमुळे लहान-मोठ्या अपघातांची शक्यता वाढली आहे. अवजड वाहने, मालवाहू ट्रक तसेच दुचाकीस्वार यांना याचा अधिक फटका बसत असल्याचे सांगितले जात आहे. चारपदरी मार्गावर वेग अधिक असल्याने योग्य प्रतिबिंबक (रिप्लेक्टर) नसल्यास धोका वाढतो.

महामार्गाच्या साईड पट्ट्यांवर सुमारे दोन फूट खोल खड्डे पडले असून त्यामुळे दुचाकीस्वारांचे अपघात नित्याचे झाले आहेत. हे खड्डे तातडीने मुरूम टाकून भरून काढणे आवश्यक आहे. अनेक ठिकाणी लेन दर्शवणाऱ्या पांढऱ्या पट्ट्या पूर्णपणे पुसट झाल्या आहेत, तर काही भागांत डांबर उघडे पडल्याने रस्त्याची अवस्था धोकादायक बनली आहे.

महामार्गाच्या विकासासाठी मोठ्या प्रमाणावर निधी मंजूर झाल्याचे सांगितले जात असले तरी प्रत्यक्षात कामांची गुणवत्ता, गती आणि देखभाल यावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. केवळ निधी मंजूर करून चालणार नाही, तर कामे वेळेत आणि दर्जेदार पूर्ण होणे गरजेचे आहे. अपघात झाल्यानंतर उपाययोजना करण्यापेक्षा अपघात टाळण्यासाठी प्रतिबंधात्मक पावले उचलणे अधिक आवश्यक आहे.

धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्ग हा केवळ दळणवळणाचा मार्ग नसून परिसराच्या आर्थिक आणि सामाजिक विकासाचा कणा आहे. त्यामुळे संबंधित विभागाने तातडीने लक्ष घालून आवश्यक सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशी नागरिकांची मागणी आहे.

याची तातडीने गरज

अर्धवट कामे तातडीने पूर्ण करावीत, महामार्गाच्या दुतर्फा व मध्यभागी उच्च दर्जाचे रिप्लेक्टर बसवावेत, बंद पडलेले पथदिवे त्वरित कार्यान्वित करावेत, आवश्यक त्या ठिकाणी स्पष्ट सूचना फलक लावावेत, साईड पट्ट्यांवरील खड्डे तातडीने बुजवावेत, लेन दर्शक पांढऱ्या पट्ट्यांचे नव्याने रंगकाम करावे

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT