धाराशिव : राज्य शासनाने प्रशासनात पारदर्शकता, गतिमानता वाढावी तसेच आधुनिक तंत्रज्ञानाच्या प्रभावी वापरातून शासकीय योजना व सुविधा थेट नागरिकांपर्यंत पोहोचाव्यात, या उद्देशाने राबविलेल्या 150 दिवसांच्या विशेष कृती कार्यक्रमात धाराशिव जिल्ह्याने राज्यस्तरीय स्पर्धेत तृतीय क्रमांक पटकावून उल्लेखनीय यश संपादन केले आहे.
जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांच्या नेतृत्वाखाली धाराशिव जिल्ह्यात प्रशासन अधिक सक्षम, तंत्रज्ञानस्नेही व नागरिक केंद्रित करण्यासाठी विविध नावीन्यपूर्ण डिजिटल उपक्रम प्रभावीपणे राबविण्यात आले. यामध्ये डिस्ट्रिक्ट डॅशबोर्ड प्रणाली, तुळजाई चॅटबॉट, कल्पवृक्ष - स्मार्ट जीआर प्रणाली तसेच जीवनरेखा प्रणाली या महत्त्वाच्या उपक्रमांचा समावेश आहे.
डिस्ट्रिक्ट डॅशबोर्ड प्रणालीमुळे विविध विभागांच्या योजनांचा एकत्रित आढावा घेणे, उद्दिष्टपूर्ती व प्रगतीवर वेळेवर लक्ष ठेवणे शक्य झाले आहे. तुळजाई चॅटबॉट द्वारे नागरिकांना संजय गांधी योजना, पुरवठा विभाग, आपत्ती व्यवस्थापन तसेच आपले सरकार सेवा केंद्राबाबतची माहिती तत्काळ उपलब्ध होत आहे.
कल्पवृक्ष - स्मार्ट जीआर प्रणाली मुळे अधिकारी व कर्मचाऱ्यांना शासन निर्णय व परिपत्रकांची अद्ययावत माहिती एका क्लिकवर मिळत असून प्रशासकीय कामकाज अधिक जलद व अचूक झाले आहे.
जीवनरेखा प्रणाली मुळे शेत रस्त्यांबाबतच्या तक्रारी व अर्जांचे प्रभावी निराकरण होत आहे. या यशात योगदान दिलेल्या सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांचे जिल्हाधिकारी पुजार यांनी अभिनंदन करत एआय तंत्रज्ञानाचा अधिकाधिक वापर करण्याचे आवाहन केले.
सरनाईक यांनी केला सत्कार
ई-ऑफिस प्रणालीच्या व्यापक वापरामुळे पेपरलेस प्रशासन साकार होत असून सेवा वितरण अधिक पारदर्शक झाले आहे. या यशाबद्दल पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांचा सत्कार करून जिल्हा प्रशासनाचे कौतुक केले.