संसाराचा गाडा ओढत ऊसतोड मजुरांची गावाबाहेर गाडी file photo
धाराशिव

Dharashiv News : संसाराचा गाडा ओढत ऊसतोड मजुरांची गावाबाहेर गाडी

सहा महिन्यांसाठी घरदार सोडण्याची वेळ; ऊसाच्या गोडव्यामागे कष्टकरी संसाराच्या वेदना

पुढारी वृत्तसेवा

Dharashiv Sugarcane harvester diwali village sugar factory

बाळासाहेब जाधवर

रत्नापूर : ऊस गोड असतो; मात्र त्याला गोडवा देणाऱ्या ऊसतोड मजुरांचे आयुष्य मात्र गोड असतेच असे नाही. साखरेच्या प्रत्येक कणामागे कष्टकरी कुटुंबांचा घाम, त्याग आणि संघर्ष दडलेला असतो.

दिवाळीचा सण, गावच्या मातीची ओढ आणि घरातील माणसांचा सहवास सोडून पोटाची खळगी भरण्यासाठी ऊसतोड मजुरांची गाडी गावाबाहेर पडू लागली आहे. गाडीवर संसाराचे गाठोडे, सोबत लहान लेकरं आणि मनात भविष्याची चिंता... असे चित्र सध्या गावोगावी पाहायला मिळत आहे.

कुणी घराला कुलूप लावून निघाले आहे, तर कुणी वृद्ध आई-वडिलांना गावातच ठेवून सहा महिन्यांसाठी स्थलांतर केले आहे. पोटासाठी अनोळखी ठिकाणी पाल ठोकायचा आणि उद्याच्या भाकरीसाठी दिवसभर राबायचे, हेच त्यांच्या जगण्याचे वास्तव बनले आहे. ऊसाच्या फडात पुरुषांइतक्याच ताकदीने महिलाही राबतात. ऊस तोडणे, मोळ्या बांधणे, वाढे गोळा करणे आणि त्या गाडीपर्यंत पोहोचवणे अशी कामे दिवसभर सुरू असतात.

याशिवाय स्वयंपाक, लेकरांची काळजी आणि संसाराची जबाबदारीही त्यांच्यावरच असते. हाताला फोड पडले, अंग दुखले तरी संसाराचा गाडा थांबू नये म्हणून त्या पुन्हा कामाला लागतात. या कष्टकरी आई-बापांच्या डोळ्यांत एकच स्वप्न असते, ते म्हणजे आपल्या मुलांनी शिकून मोठे व्हावे आणि आपल्यासारखे कष्टाचे जीवन त्यांच्या वाट्याला येऊ नये. मात्र स्थलांतरामुळे अनेक मुलांच्या शिक्षणात खंड पडतो. खेळण्या-बागडण्याच्या वयात त्यांनाही आई-वडिलांसोबत ऊसाच्या फडात राहावे लागते.

पिण्याचे पाणी, निवारा, आरोग्य सुविधा आणि शिक्षण अशा अनेक समस्यांशी त्यांना झुंजावे लागते. ऊसतोड मजुरांना योग्य मजुरी, सुरक्षित कामाची परिस्थिती, आरोग्य सुविधा आणि स्वच्छ निवास मिळणे गरजेचे आहे. त्यांच्या मुलांचे शिक्षण खंडित होऊ नये, यासाठीही ठोस व्यवस्था उभी राहायला हवी. विशेषतः महिलांच्या श्रमांची योग्य दखल घेतली पाहिजे.

ऊसाच्या मोळ्या बांधताना या महिला केवळ ऊस बांधत नसतात, तर आपल्या संसाराच्या आशाही बांधत असतात. साखरेचा गोडवा सर्वांच्या आयुष्यात पोहोचवणाऱ्या या कष्टकरी हातांच्या आयुष्यातही सुखाचा गोडवा यायला हवा. कारण ऊस गोड असतो; पण त्या गोडव्यामागची कहाणी मात्र कष्टाची, त्यागाची आणि वेदनेची असते!

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT