Dharashiv News : 'डिजिटल' सुविधेचा फज्जा; कार्डमध्ये पैसे, तरीही पूर्ण तिकीट ! file photo
धाराशिव

Dharashiv News : 'डिजिटल' सुविधेचा फज्जा; कार्डमध्ये पैसे, तरीही पूर्ण तिकीट !

'सर्व्हर डाऊन'च्या नावाखाली महिला, ज्येष्ठ नागरिकांना भुर्दंड

पुढारी वृत्तसेवा

Dharashiv News: 'Digital' facility useless; despite having funds on the card, full fare charged!

भूम, पुढारी वृत्तसेवाः भूम मधील व तालुक्यातील ग्रामीण मधील प्रवाशांच्या सोयीसाठी एसटी महामंडळाने सुरू केलेल्या एनसीएमसी कार्ड व्यवस्थेचा तांत्रिक बोजवारा उडाल्याचे चित्र आहे. कार्डमध्ये पैसे उपलब्ध असतानाही बसमधील मशीनवर व्यवहार होत नसल्याने 'सव्र्व्हर डाऊन आहे' असे सांगून प्रवाशांना पुन्हा पूर्ण तिकीट काढण्याची वेळ येत आहे.

डिजिटल सुविधेच्या नावाखाली प्रवाशांच्या खिशाला कात्री लावली जात असल्याने संताप व्यक्त होत आहे. विशेषतः महिला आणि ज्येष्ठ नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे. अमृत महोत्सव योजनेअंतर्गत ७५ वर्षे व त्यावरील ज्येष्ठ नागरिकांना प्रवासात सवलत असतानाही मशीनमधील तांत्रिक अडचणीचे कारण देत काही प्रवाशांकडून पूर्ण तिकीट आकारण्यात आल्याच्या तक्रारी आहेत.

काही वाहकांनी मात्र परिस्थिती समजून घेत सवलतीनुसार दोन रुपये तिकीट देऊन सहकार्य केले. मात्र सर्वच ठिकाणी अशीच भूमिका घेतली जात नसल्याने प्रवाशांमध्ये नाराजी आहे. "एसटीने कार्ड घ्या, त्यात पैसे भरा आणि कॅशलेस प्रवास करा, असे सांगितले. आम्ही पैसे भरले; पण बसमध्ये कार्डच चालत नसेल तर या डिजिटल सुविधेचा उपयोग काय?" असा संतप्त सवाल ज्येष्ठ प्रवाशांनी केला आहे. काही प्रवाशांकडे आधार कार्ड तसेच एनसीएमसी कार्ड असूनही तांत्रिक अडचणीमुळे पूर्ण तिकीट काढावे लागल्याचे सांगण्यात येत आहे. सर्व्हर बंद असणे ही प्रवाशांची चूक नसताना त्याची शिक्षा प्रवाशांनाच का? असा सवाल आता उपस्थित होत आहे.

तांत्रिक बिघाड झाल्यास सवलतीच्या प्रवाशांसाठी पर्यायी व्यवस्था काय, याबाबत एसटी महामंडळाने स्पष्ट धोरण जाहीर करावे. कार्डमध्ये पैसे असूनही पुन्हा पैसे मोजावे लागणाऱ्या प्रवाशांचे नुकसान टाळावे. डिजिटल सुविधा सुरू केली, तर ती सुरळीत चालवण्याची जबाबदारीही एसटीचीच ! 'सर्व्हर डाऊन'च्या नावाखाली प्रवाशांची गैरसोय आणि आर्थिक भुर्दंड थांबवा; अन्यथा एनसीएमसी कार्ड "सर्व्हर डाऊनची शिक्षा प्रवाशांना का?""एनसीएमसी कार्डमध्ये पैसे असूनही एसटीचा सर्व्हर डाऊन असल्याने महिला व ज्येष्ठ नागरिकांना पुन्हा पूर्ण तिकीट काढावे लागत आहे. तांत्रिक बिघाड एसटीचा असताना त्याचा आर्थिक भुर्दंड प्रवाशांनी का सहन करायचा?" असा संतप्त सवाल प्रवासी संघटनेचे सदस्य अरविंद शिंदे यांनी केला.

व्यवस्थाच बंद करा, अशी संतप्त मागणी नागरिकांकडून होत आहे. प्रवाशांना आधुनिक सुविधा देण्याच्या नावाखाली कार्ड दिले; पण ऐनवेळी कार्डच चालत नसेल तर ही सुविधा नसून प्रवाशांची गैरसोय आहे. प्रशासनाने केवळ 'सव्व्हर डाऊन' असे सांगून हात झटकू नयेत, अशी तीव्र प्रतिक्रिया प्रवाशांनी व्यक्त केली.

एसटी महामंडळाने एनसीएमसी कार्डची तांत्रिक यंत्रणा सक्षम करून महिला व ज्येष्ठ नागरिकांना पुन्हा पूर्ण तिकीट काढण्याची वेळ येणार नाही, याची दक्षता घ्यावी, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. एनसीएमसी कार्ड सेवा तातडीने सुरळीत करावी. तोपर्यंत अमृत महोत्सव लाभार्थ्यांना आधार कार्ड पाहून केवळ दोन रुपयांत तिकीट देऊन प्रवाशांची गैरसोय थांबवावी, अशी मागणीही शिंदे यांनी केली.

टॉप अप करण्याच्या मशीनवरकार्डवर एकदम लोड आल्यामुळे मशीन चालत नव्हत्या परंतु काही वेळ चालायच्या काही वेळ बंद पडायच्या आम्ही वरिष्ठांना देखील कळवलं आहे. आमच्या हातात देखील काय पर्याय नाहीये कारण मशीन मधील फ्युचर बदलल्यामुळे वाहकांना देखील प्रवाशांचा सामना करावा लागतो असे आगार अधिकारी श्रीकांत सुरवसे यांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT