Dharashiv Theft News | येडेश्वरीच्या दर्शनाला आले अन् चोरट्यांनी साधला डाव

भाविकांच्या गर्दीत १ लाख ४० हजारांचे सोन्याचे दागिने लंपास; मंदिर परिसरात खळबळ
Solapur Theft
Theft (Pudhari File Photo)
Published on
Updated on

Yedeshwari Temple Theft

रत्नापूर : येडेश्वरी देवीच्या दर्शनासाठी आलेल्या भाविकांच्या गर्दीचा फायदा घेत अज्ञात चोरट्याने एका भाविकाच्या अंगावरील तब्बल १ लाख ४० हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने लंपास केल्याची घटना समोर आली आहे. दर्शनासाठी आलेल्या भाविकाचे दागिने गर्दीतून चोरीला गेल्याने मंदिर परिसरात खळबळ उडाली आहे.

सावरगाव (ता. बार्शी, जि. सोलापूर) येथील राहुल सदाशिव गर्जे (वय ३४) हे आई आणि पुतणीसह २८ ऑगस्ट रोजी येडेश्वरी देवीच्या दर्शनासाठी आले होते. सकाळी १०.५० ते ११.३० या वेळेत श्री येडेश्वरी मंदिराच्या डोंगराला प्रदक्षिणा घालताना तसेच श्रद्धेने दोरा बांधत असताना गर्दीचा फायदा घेत अज्ञात चोरट्याने त्यांच्या अंगावरील सोन्याच्या दागिन्यांवर डल्ला मारला.

Solapur Theft
Dharashiv Politics : शिंदे सेना, भाजपच्या लढाईत ठाकरेंच्या शिवसेनेची वाताहत

गर्दीत नेमकी कधी आणि कशा प्रकारे चोरी झाली, याची कल्पना येण्यापूर्वीच दागिने गायब झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. चोरीला गेलेल्या सोन्याच्या दागिन्यांची एकूण किंमत १ लाख ४० हजार रुपये असल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

या घटनेप्रकरणी राहुल गर्जे यांनी १ सप्टेंबर रोजी येरमाळा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून भारतीय न्याय संहितेच्या कलम ३०४ आणि ३(५) अन्वये अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. येरमाळा पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

Solapur Theft
Dharashiv Traffic News : दुचाकी-चारचाकींवर कारवाई; मोठ्या वाहनांवर 'अॅक्शन' कधी ?

गर्दीत चोरट्यांचा वावर?

येडेश्वरी देवीच्या दर्शनासाठी दररोज मोठ्या संख्येने भाविक येत असतात. अशा गर्दीचा फायदा घेत चोरीची घटना घडल्याने मंदिर परिसरातील भाविकांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. गर्दीमध्ये हातचलाखी करणाऱ्या चोरट्याचा शोध घेऊन त्याला जेरबंद करण्याचे आव्हान येरमाळा पोलिसांसमोर आहे.

मंदिर परिसरात सुरक्षा व्यवस्था अधिक कडक करावी तसेच गर्दीच्या ठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त वाढवावा, अशी मागणी भाविकांकडून करण्यात येत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news