Dharashiv National Deworming Campaign pudhari photo
धाराशिव

Dharashiv National Deworming Campaign : राष्ट्रीय जंतनाशक मोहिमेला प्रारंभ

धाराशिव : ४ लाख ३६ हजार बालकांना गोळ्या देण्याचे उद्दिष्ट

पुढारी वृत्तसेवा

धाराशिव : बालकांचे आरोग्य सुदृढ राखून जंतसंसर्गाला प्रतिबंध करण्यासाठी जिल्ह्यात २७ ऑक्टोबरपासून राष्ट्रीय जंतनाशक मोहिमेला सुरुवात झाली. या मोहिमेंतर्गत जिल्ह्यातील एक ते १९ वर्षे वयोगटातील चार लाख ३६ हजार २४३ बालकांना जंतनाशक गोळ्या देण्याचे उद्दिष्ट आहे. जिल्ह्यातील एक हजार ४६१ शाळा, एक हजार ७४८ अंगणवाड्या आणि ३०३ आरोग्य संस्थांच्या माध्यमातून ही मोहीम राबविण्यात येत आहे.

जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार आणि जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी प्रियंवदा म्हाडदळकर यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य विभागाने मोहिमेचे नियोजन केले आहे. येरमाळा येथील जिल्हा परिषद शाळेत मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला.

यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सतीश हरिदास, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. शिवाजी फुलारी, जिल्हा माता व बालसंगोपन अधिकारी डॉ. कुलदीप मिटकरी, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. गोवर्धन महेंद्रकर आणि वैद्यकीय अधिकारी डॉ. सुधाकर बिरादार उपस्थित होते.

जंतसंसर्गामुळे बालकांमध्ये रक्तक्षय, अशक्तपणा, भूक मंदावणे आणि शारीरिक वाढ खुंटण्यासारख्या समस्या उद्भवू शकतात. त्याचा परिणाम एकाग्रता आणि बौद्धिक विकासावरही होतो. त्यामुळे आरोग्य, शिक्षण आणि महिला व बालविकास विभागाच्या समन्वयातून शाळकरी, अंगणवाडीतील तसेच शाळाबाह्य बालकांपर्यंत पोहोचण्याचे नियोजन करण्यात आले आहे. २७ ऑक्टोबर रोजी गोळी घेऊ न शकलेल्या पात्र बालकांसाठी ३ नोव्हेंबर रोजी विशेष पूरक दिवस आयोजित करण्यात आला आहे.

पालकांनी आरोग्य कर्मचाऱ्यांच्या मार्गदर्शनानुसार आपल्या पाल्यांना जंतनाशक औषध द्यावे, असे आवाहन डॉ. कुलदीप मिटकरी यांनी केले. हात स्वच्छ धुणे, स्वच्छ पाणी पिणे, नखे नियमित कापणे आणि परिसर स्वच्छ ठेवणे यांसारख्या सवयीही अंगीकाराव्यात, असे आवाहन डॉ. सतीश हरिदास यांनी केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT