Sambhajinagar Public Handpump Survey : मनपाकडून शहरातील हातपंपांच्या सर्वेक्षणाला सुरुवात

साडेबाराशेहून अधिक हातपंप, त्यापैकी २९० बंद : भूजल पातळी खालावल्यास संख्या आणखी वाढण्याची शक्यता
Sambhajinagar Public Handpump Survey
Sambhajinagar Public Handpump Surveyfile photo
Published on: 
Updated on: 

छत्रपती संभाजीनगर : पावसाने ओढ दिल्याने जायकवाडी धरणासह हर्मूल तलावातील पाणीसाठ्यावर परिणाम झाला आहे. त्यामुळे आगामी काळात शहरात पाणीटंचाई तीव्र होऊ नये, यासाठी महापालिका प्रशासनाने पर्यायी जलस्रोतांचा आढावा घेण्यास सुरुवात केली आहे. शहरातील सार्वजनिक हातपंपांची सद्यस्थिती तपासून नादुरुस्त हातपंपांची दुरुस्ती करण्यासाठी सर्वेक्षण सुरू करण्यात आले आहे.

महापौर समीर राजूरकर आणि आयुक्त अमोल येडगे यांच्या निर्देशानुसार पाणीपुरवठा विभागाने या कामाला गती दिली आहे. शहरात साडेबाराशेहून अधिक हातपंप असून त्यापैकी २९० पंप बंद आहेत. मात्र, भूजल पातळी खालवल्यास ही संख्या आणखी वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

Sambhajinagar Public Handpump Survey
Harsul Lake Water Level : हर्सूल तलाव तळ गाठण्याच्या मार्गावर

महापालिका क्षेत्रात काही वर्षांपूर्वी नगरसेवकांच्या शिफारशीवरून नागरिकांच्या सोयीसाठी सार्वजनिक हातपंप बसविण्यात आले होते. मात्र, रस्ते रुंदीकरण आणि सिमेंट काँक्रिटचे रस्ते तयार करताना अनेक हातपंप बंद पडले आहेत.

तसेच काही ठिकाणी भूजल पातळी खालावल्याने पाणी मिळणे बंद झाले आहे. महापालिकेच्या नोंदीनुसार, शहरात १,२६५ हातपंप आहेत. त्यापैकी रस्ते रुंदीकरणामुळे ८८, तर भूजल पातळी घटल्याने २०२ हातपंप बंद पडले आहेत. सध्या ६४९ हातपंपांद्वारे पाणी उपलब्ध होत आहे. मात्र उन्हाळ्यात भूजल पातळी आणखी खालावल्यास वापरातील हातपंपांची संख्या घटण्याची शक्यता आहे.

तसेच सार्वजनिक हातपंपांचा खासगी वापर होत असल्याच्या तक्रारीही पुढे आल्या आहेत. दरम्यान, सुमारे दहा वर्षापूर्वी नागरिकांच्या विरोधानंतरही नगरसेवकांनी रहिवाशांची समजूत काढून घरांसमोर सार्वजनिक हातपंप बसविले होते. सुरुवातीला पाणीपुरवठा उशिरा झाल्यास परिसरातील नागरिक या हातपंपांवरून पाणी भरत होते. मात्र, कालांतराने काही ठिकाणी हातपंपांवर विद्युत मोटारी बसवून खासगी पाइपलाइनद्वारे पाणी घेण्यास सुरुवात झाल्याच्या तक्रारी आहेत.

तसेच सार्वजनिक हातपंपांव्यतिरिक्त विद्युत मोटारींच्या साहाय्याने पाणी उपसल्या जाणाऱ्या १११ विंधन विहिरींचीही नोंद आहे. यामध्ये महापालिकेच्या शाळा, आरोग्य केंद्रे आणि रुग्णालयांमधील विंधनविहिरींचा समावेश आहे. या जलस्रोतांचीही वेळोवेळी पाहणी व दुरुस्ती करण्यात येते, अशी माहिती प्रशासनाने दिली.

Sambhajinagar Public Handpump Survey
Sambhajinagar Municipal Corporation Revenue : गुंठेवारीतून मनपाच्या तिजोरीत १०० कोटी

या क्रमांकावर करा तक्रार

सार्वजनिक हातपंपांचा खासगी वापर होत असल्यास नागरिकांनी महापालिकेच्या संबंधित विभागाकडे तक्रार करावी, असे आवाहन करण्यात आले आहे. यासाठी ९८२३१४९५०४ हा संपर्क क्रमांक देण्यात आला आहे. तक्रार प्राप्त झाल्यानंतर संबंधित ठिकाणांची तपासणी करून आवश्यक कार्यवाही करण्यात येणार आहे. सार्वजनिक निधीतून उभारलेले हातपंप पुन्हा सर्व नागरिकांसाठी उपलब्ध व्हावेत आणि पाणीटंचाईच्या काळात त्यांचा प्रभावी वापर करता यावा, यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न सुरू आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news