Mandwa Gambling Raid
वाशी : वाशी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील मांडवा येथील पारधी पिढी परिसरात सुरू असलेल्या तिरट जुगार अड्ड्यावर स्थानिक गुन्हे शाखेच्या (एलसीबी) पथकाने मध्यरात्री धाड टाकून २२ जणांना रंगेहाथ पकडले. या कारवाईत रोख रकमेसह १५ मोबाईल, चारचाकी वाहन व जुगाराचे साहित्य असा एकूण १७ लाख २६ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
पोलीस अधीक्षक रितू खोखर यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबीचे पोलीस निरीक्षक विनोद इज्जपवार यांना मांडवा गावातील पारधी पिढी परिसरात मोठ्या प्रमाणात तिरट जुगार सुरू असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. सदर परिसर संवेदनशील असल्याने कारवाईदरम्यान आव्हान निर्माण होण्याची शक्यता होती. त्यामुळे एलसीबी अधिकारी व अंमलदारांसह जलद प्रतिसाद पथक आणि दंगा नियंत्रण पथकाची मदत घेऊन नियोजनबद्ध पद्धतीने छापा टाकण्यात आला.
पोलिसांनी कारवाई सुरू करताच जुगार खेळणाऱ्यांमध्ये धावपळ उडाली. मात्र, पोलिसांनी २२ जणांना पकडले. त्यांच्याकडून २ लाख ४६ हजार ६०० रुपये रोख, १५ मोबाईल, एक चारचाकी वाहन आणि जुगाराचे साहित्य असा १७ लाख २६ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी वाशी पोलिस ठाण्यात जुगार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या कारवाईतील संतोष रमेश काळे (रा. मांडवा) हा १४ चोरीच्या गुन्ह्यांत पाहिजे आरोपी असल्याचे पोलिसांनी सांगितले. तसेच अतुल कालिदास काळे (रा. कन्हेरवाडी पाटी) हा वाशी पोलिस ठाण्यातील दरोड्याच्या गुन्ह्यात पाहिजे आरोपी असल्याचे समोर आले आहे.
अपर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबीचे निरीक्षक विनोद इज्जपवार, सपोनि सचिन खटके यांच्यासह पोलिस कर्मचाऱ्यांनी ही कारवाई केली. आरसीपी व क्यूआरटी पथकातील अंमलदारांनीही सहभाग घेतला.