illegal gutkha seized
रत्नापूर : स्थानिक गुन्हे शाखेने धाराशिव जिल्ह्यात मोठी धाडसी कारवाई करत तब्बल ६२ लाख ४८ हजार ६० रुपयांचा गुटखा, सुगंधित तंबाखू आणि तीन मोटारसायकली जप्त केल्या आहेत. या कारवाईमुळे अवैध गुटखा व्यवसाय करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.
दि. १७ मे २०२६ रोजी पोलीस अधीक्षक रितु खोखर आणि अपर पोलीस अधीक्षक शफकत आमना यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विनोद इज्जपवार यांच्या आदेशानुसार पथक जिल्ह्यात अवैध धंद्यांवर कारवाईसाठी पेट्रोलिंग करत होते.
दरम्यान, येरमाळा परिसरात पथकाला गोपनीय माहिती मिळाली की, वडजी शिवारातील डोंगर परिसरात तलावाजवळ एका लिंबाच्या झाडाखाली ताडपत्री झाकून मोठ्या प्रमाणात गुटखा साठवण्यात आला आहे. तसेच तेरखेडा येथील लक्ष्मी पारधी पिढीतील काही व्यक्ती तेथे थांबले असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.
माहिती मिळताच पोलीस निरीक्षक विनोद इज्जपवार तातडीने घटनास्थळी दाखल झाले. येरमाळा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक तात्याराव भालेराव आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकासह संबंधित ठिकाणी सापळा रचण्यात आला.
पोलीस पथक घटनास्थळी पोहोचताच ताडपत्रीजवळ बसलेले सात ते आठ जण पळून जाण्याचा प्रयत्न करू लागले. पोलिसांनी त्यांचा पाठलाग केला असता बहुतांश जण डोंगराच्या दिशेने पसार झाले. मात्र, पोलिसांनी एका संशयिताला ताब्यात घेण्यात यश मिळवले.
चौकशीदरम्यान त्याने आपले नाव छगन बिसराम शिंदे, रा. लक्ष्मी पारधी पिढी, तेरखेडा असे सांगितले. ताडपत्रीखाली ठेवलेल्या पोत्यांमध्ये गुटखा असल्याची कबुली त्याने दिली. तसेच हा माल तेरखेडा येथील काही जण आणि मस्सा येथील एका व्यक्तीसोबत आणल्याची माहितीही त्याने पोलिसांना दिली.
पोलिसांनी ताडपत्री हटवून पोती तपासली असता त्यामध्ये ‘राजनिवास’ गुटखा आणि सुगंधित तंबाखूचा मोठा साठा आढळून आला. या कारवाईत गुटखा, तंबाखू आणि तीन मोटारसायकली असा एकूण ६२ लाख ४८ हजार ६० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
या प्रकरणी येरमाळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी छगन बिसराम शिंदे याला पुढील कायदेशीर कारवाईसाठी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक रितु खोखर आणि अपर पोलीस अधीक्षक शफकत आमना यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विनोद इज्जपवार, सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन खटके, सहाय्यक पोलीस निरीक्षक तात्याराव भालेराव, पोलीस हवालदार विनोद जानराव, नितीन जाधवर, बबन जाधवर, महिला पोलीस हवालदार शोभा बांगर, पोलीस कर्मचारी महेबुब अरब, रोहित दंडनाईक आणि प्रकाश बोईनवाड यांच्या पथकाने पार पाडली.