Dharashiv Tuljapur railway project : श्रेयवादाच्या रुळावरून तुळजापूर रेल्वे सुसाट

खासदार यूबीटी शिवसेनेचे असून आमदार भाजपचे आहेत. त्यामुळे हे काम नेमके कोणाचे यावरून सोशल मीडिया वॉर रंगले आहे.
Dharashiv Tuljapur railway project
श्रेयवादाच्या रुळावरून तुळजापूर रेल्वे सुसाटpudhari photo
Published on
Updated on

धाराशिव : भीमाशंकर वाघमारे

धाराशिव जिल्ह्यावर असलेला ‌‘दुष्काळी‌’ शिक्का पुसण्यासाठी सर्व पक्षांची लढाई मागील सत्तर वर्षांपासून सुरू असली तरी हा शिक्का पुसण्यापेक्षा तो अधिक ठळक होत गेला. यात दोष राजकीय पक्षांचा की सत्तेची ऊब अनुभवणाऱ्या राजकीय नेत्यांचा? हा स्वतंत्र चर्चेचा मुद्दा आहे. आजघडीला सर्वात मोठा विषय चर्चेत आहे तो म्हणजे धाराशिव ते तुळजापूर रेल्वेचे काम. हे काम सध्या प्रगतीपथावर आहे.

गेल्या आठवड्यातच भाजपचे आ. राणाजगजितसिंह पाटील यांनी शिंगोली गावातील होणाऱ्या रेल्वे पुलाची माहिती दिली. त्यानंतर सोशल मीडियावर भाजप तसेच ठाकरे यांच्या शिवसेनेकडून जोरदार टोलेबाजी सुरू झाली. खासदार यूबीटी शिवसेनेचे असून आमदार भाजपचे आहेत. त्यामुळे हे काम नेमके कोणाचे यावरून सोशल मीडिया वॉर रंगले आहे.

Dharashiv Tuljapur railway project
Thorium nuclear energy | थोरियमपासून अणुऊर्जेचा निर्णायक टप्पा

2014 च्या विधानसभा निवडणुकीच्या प्रचारावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे तुळजापूर येथे जाहीर सभेसाठी आले होते. त्या वेळी त्यांनी तुळजापूर शहर रेल्वेच्या नकाशावर आणण्याचे जाहीर आश्वासन दिले होते. त्या वेळी तुळजापुरातून भाजपचा पराभव झाला. अर्थात शिवसेना व भाजप हे दोन्ही पक्ष त्या वेळी स्वतंत्र निवडणूक लढवत होते. पुढे 2019 च्या निवडणुकीत मात्र भाजपने ही जागा जिंकली.

तत्पूर्वी सहा महिने अगोदर झालेल्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेतर्फे ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी राष्ट्रवादीचे तत्कालीन नेते राणाजगजितसिंह पाटील यांचा पराभव केला होता. तर तेच पाटील पुढे भाजपतर्फे तुळजापुरातून विधानसभेवर पोहोचले. त्या वेळी खा. राजेनिंबाळकर यांनी प्रत्येक महिन्याला तुळजापूर ते सोलापूर रेल्वेमार्गाच्या प्रगतीचा आढावा घेण्याचा सिलसिला सुरू ठेवला. त्या वेळी प्रत्येक वर्षीच्या केंद्रीय अर्थसंकल्पात अतिशय तोकडी तरतूद या मार्गासाठी व्हायची. तरीही खा. राजेनिंबाळकर यांनी सातत्याने रेल्वेच्या आढावा बैठका कायम ठेवल्या. त्या वेळी राज्यातही महायुतीची सत्ता होती. त्यामुळे राजकीय गणितेही बदलली होती.

Dharashiv Tuljapur railway project
Thane electricity crisis : ठामपा, एमएमआरडीएच्या नियोजनशून्य कारभारामुळे दोन लाख ग्राहक अंधारात

2022 मध्ये राज्यात पुन्हा सत्ता बदल झाल्यानंतर मात्र राजकीय ईष्या टोकाला पोहोचली. त्यातूनच तुळजापूर रेल्वेमार्गाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला. हा विषय हळूहळू पुढे सरकू लागला. या काळातही लोकसभेत खा. राजेनिंबाळकर यांनी रेल्वेचे प्रश्न मांडत पाठपुरावा सुरूच ठेवला. तर इकडे राज्य सरकारच्या वाट्याचा हिस्सा भरण्याच्या निमित्ताने आ. राणाजगजितसिंह पाटील यांनी या रेल्वेमार्गाकडे लक्ष देण्यास सुरुवात केली.

2022 ते 2025 या तीन वर्षांच्या काळात बऱ्यापैकी तरतूद झाल्याने पहिल्या टप्प्यात धाराशिव ते तुळजापूरपर्यंतचे काम हाती घेण्यात आले. आता या कामाला बऱ्यापैकी गती मिळाली आहे. मोठ्या पुलांची कामे रेल्वेने हाती घेतली असून रुळ अंथरण्याची तयारीही सुरू केली आहे.

या प्रकल्पातील अत्यंत कठीण आणि महत्त्वाचा टप्पा असलेल्या शिंगोलीजवळील सोलापूर-धुळे राष्ट्रीय महामार्गावरील रेल्वे पुलाचे काम आता प्रगतीपथावर आहे. विशेष म्हणजे, मध्य रेल्वेच्या इतिहासातील हा सर्वाधिक लांबीचा 106 मीटर लांबीचा ‌‘सिंगल स्पॅन‌’ पूल असेल. सोलापूर-तुळजापूर-धाराशिव या 84.44 किमी लांबीच्या नवीन रेल्वे लाईनच्या कामाच्या प्रगतीचा आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी शिंगोली येथे प्रत्यक्ष कामाच्या ठिकाणी जाऊन आढावा घेतला.

त्यांनी ही माहिती जाहीर केल्यानंतर लागलीच शिवसेनेतर्फे सोशल मीडियावर खा. राजेनिंबाळकर यांनी केलेल्या पाठपुराव्याची यादी टाकत आ. पाटील यांनी फुकटचे श्रेय घेऊ नये, असा टोला लगावला. तर तत्काळ भाजपनेही या टीकेला जोरदार प्रत्युत्तर देत ठाकरे सरकारच्या काळात हा प्रकल्प कसा रखडला होता व भाजप सत्तेवर आल्यानंतर प्रकल्पाला कशी गती मिळाली, याची माहिती शेअर करण्यात आली. त्यानंतर दोन्ही बाजूंनी अद्यापही श्रेयवाद रंगलेलाच आहे.

एका बाजूला हा वाद असला तरी दुसऱ्या बाजूला मात्र या प्रकल्पाचा धाराशिव ते तुळजापूर हा पहिला टप्पा मार्च 2027 पर्यंत पूर्ण होण्याचे उद्दिष्ट प्रशासनाने ठेवले आहे. तर, सोलापूर ते तुळजापूर हा दुसरा टप्पा त्यानंतर पूर्ण केला जाणार आहे.

  • या प्रकल्पातील अत्यंत कठीण आणि महत्त्वाचा टप्पा असलेल्या शिंगोलीजवळील सोलापूर-धुळे राष्ट्रीय महामार्गावरील रेल्वे पुलाचे काम आता प्रगतीपथावर आहे. विशेष म्हणजे, मध्य रेल्वेच्या इतिहासातील हा सर्वाधिक लांबीचा 106 मीटर लांबीचा ‌‘सिंगल स्पॅन‌’ पूल असेल. सोलापूर - तुळजापूर - धाराशिव या 84.44 किमी लांबीच्या नवीन रेल्वे लाईनच्या कामाच्या प्रगतीचा आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी शिंगोली येथे प्रत्यक्ष कामाच्या ठिकाणी जाऊन आढावा घेतला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news