तानाजी गवळी Pudhari
धाराशिव

Dharashiv Farmer Death | आर्थिक विवंचनेतून चिखलीतील शेतकऱ्याने संपवली जीवनयात्रा

धाराशिव तालुक्यातील चिखली येथील घटनेने खळबळ

पुढारी वृत्तसेवा

Dharashiv Chikhali Financial Crisis Farmer

समुद्रवाणी : सततचा दुष्काळ, नापिकी, शेतीमालाला मिळणारा अपुरा भाव, वाढते कर्ज आणि मुलांच्या उच्च शिक्षणाचा प्रचंड खर्च यामुळे आर्थिक संकटात सापडलेल्या चिखली येथील शेतकरी तानाजी दत्तू गवळी (वय ४५) यांनी गळफास घेऊन जीवन संपविल्याची हृदयद्रावक घटना घडली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून शेतकरी वर्गातून तीव्र संतापही व्यक्त केला जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, धाराशिव तालुक्यातील चिखली येथील तानाजी गवळी हे गेल्या दोन वर्षांपासून गंभीर आर्थिक संकटाचा सामना करत होते. मागील काही वर्षांपासून दुष्काळी परिस्थिती, अवकाळी पाऊस आणि अतिवृष्टीमुळे शेतीचे मोठे नुकसान झाले होते. गतवर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे हातातोंडाशी आलेले पीक वाहून गेले, तर यावर्षी जुलै महिना उलटूनही समाधानकारक पाऊस न झाल्याने पेरण्या रखडल्या आहेत.

शेतीतील उत्पन्न घटल्याने कुटुंबाचा उदरनिर्वाह आणि दोन मुलांच्या उच्च शिक्षणाचा खर्च पेलणे त्यांना कठीण झाले होते. त्यांची दोन्ही मुले अभियांत्रिकीचे शिक्षण घेत असून त्यासाठी मोठा आर्थिक भार सहन करावा लागत होता. त्यातच पेरणीसाठी बियाणे, खते आणि इतर शेतीसाठी आवश्यक साहित्य खरेदी करण्याचीही आर्थिक क्षमता उरली नव्हती.

तानाजी गवळी यांनी अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे कर्ज घेतले होते. कर्जाचे हप्ते भरूनही दीड वर्षांपासून व्याज परताव्याची रक्कम मिळाली नसल्याची माहिती समोर आली आहे. लहानपणीच वडिलांचे छत्र हरपल्याने त्यांनी कुटुंबाची जबाबदारी खांद्यावर घेत संसार उभा केला होता. मात्र, वाढत्या आर्थिक अडचणींमुळे ते नैराश्यात गेले होते.

ही घटना बुधवारी (दि. १६) सकाळी अकराच्या सुमारास उघडकीस आली. तानाजी गवळी यांनी आपल्या शेतातील झाडाला गळफास घेऊन जीवन संपवले. घटनेची माहिती मिळताच पोलीस प्रशासनाने घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. त्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आला. चिखली येथील स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

त्यांच्या पश्चात पत्नी आणि दोन मुले असा परिवार आहे. या घटनेमुळे संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे.

घोषणांचा पाऊस; शेतकरी मृत्यू थांबेनात?

राज्यातील शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी, अनुदान आणि विविध योजनांच्या घोषणा सातत्याने केल्या जात असल्या, तरी अनेक योजनांचा लाभ प्रत्यक्षात तळागाळातील शेतकऱ्यांपर्यंत पोहोचत नसल्याची भावना व्यक्त होत आहे. सततची नापिकी, वाढते उत्पादन खर्च, अपुरी आर्थिक मदत आणि कर्जाचा वाढता बोजा यामुळे शेतकरी हतबल होत आहे. शासनाने केवळ घोषणा न करता तातडीने ठोस उपाययोजना करण्याची मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT