

शंकर बिराजदार
उमरगा : जिल्ह्यातील आजी-माजी लोकप्रतिनिधींनी विविध विकासकामे, निधी, रस्ते, इमारती आणि योजनांच्या माध्यमातून विकासाचे दावे केले. मात्र या सर्व विकासाच्या गदारोळात सर्वसामान्यांच्या मूलभूत आरोग्य सुविधांकडे सातत्याने दुर्लक्ष झाल्याचे वास्तव 'पुढारी'च्या 'श्वास अडखळतोय' वृत्त मालिकेतून समोर आले आहे. या मालिकेने मूळ समस्या समोर आणल्या असून त्या सोडविण्यासाठी नक्की प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले.
केंद्र सरकारच्या नीती आयोगाच्या मागास जिल्ह्याच्या यादीत धाराशिवचा तिसरा क्रमांक आहे. मागास जिल्हा विकासासाठी राबविण्यात येत असलेल्या उपक्रमांतर्गत विकासाचा आराखडा तयार करून प्रामुख्याने आरोग्य क्षेत्रातील निर्देशांक निश्चित करण्यात आला आहे. मात्र रुग्णवाहिकांमध्ये 'बाय पॅप'सारख्या जीवनरक्षक उपकरणांचा अभाव, उपजिल्हा रुग्णालयासाठी कार्डियाक रुग्णवाहिका नसणे, गंभीर रुग्णांना उपचारासाठी हलविताना उद्भवणाऱ्या अडचणी, तसेच खासगी रुग्णवाहिकांच्या मनमानी कारभारामुळे गरीब रुग्ण आर्थिक आणि मानसिक संकटात सापडत आहेत.
कोरोना महामारीने सक्षम आरोग्य व्यवस्थेचे महत्त्व अधोरेखित केले. तरीही त्यातून काही धडा घेतला नाही. आरोग्यसेवा ही केवळ घोषणा किंवा राजकीय श्रेय घेण्याचा विषय नसून ती नागरिकांचा मूलभूत अधिकार आहे.
कोट्यवधी रुपयांच्या विकासकामां इतकेच महत्त्व जीव वाचविणाऱ्या सुविधांनाही दिले गेले पाहिजे. विकासाच्या दाव्यांपेक्षा एखाद्या गंभीर रुग्णाचा वेळेत व सुरक्षित उपचार होणे अधिक महत्त्वाचे आहे. त्यामुळे शासन, प्रशासन आणि सर्व लोकप्रतिनिधींनी पक्षीय राजकारण बाजूला ठेवून आपत्कालीन आरोग्य सेवा सक्षम करण्यासाठी तातडीने ठोस पावले उचलणे काळाची गरज आहे. कारण विकासाची खरी ओळख इमारतींनी नव्हे, तर वाचलेल्या जीवांनी ठरत असते.
जिल्ह्यातील सर्व शासकीय रुग्णवाहिकांमध्ये बाय-पॅप मशीनसह अत्याधुनिक आवश्यक वैद्यकीय उपकरणे उपलब्ध करून देण्याबाबत जिल्हा शल्यचिकित्सक, जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांना सूचना देऊन सद्यस्थितीचा अहवाल मागविणार आहे. अहवाल प्राप्त होताच आवश्यक कार्यवाही केली जाईल. याशिवाय खासगी रुग्णवाहिकांकडून होणारी आर्थिक लूट आणि नियमबाह्य वाहतुकीच्या बेकायदेशीर प्रकारांवर परिवहन विभागाला आवश्यक सूचना दिल्या जातील. गरीब रुग्णांना मोफत आणि दर्जेदार आपत्कालीन सेवा वेळेत मिळणे हेच आमचे प्राधान्य आहे.
उषा गायकवाड, उपाध्यक्ष जिल्हा परिषद धाराशिव)
उमरग्यात आरोग्य सुविधा उपलब्ध असल्या तरी १०८ रुग्णवाहिका अत्याधुनिक नसल्याने नागरिकांना खासगी रुग्णवाहिकांवर अवलंबून राहावे लागत आहे. खासगी रुग्णवाहिकांचे दर व सुविधांचे नियमन आवश्यक आहे. आगामी अधिवेशनात रुग्णवाहिकेत ऑक्सिजन, बाय-पॅप व आधुनिक उपकरणांबाबत निकष ठरविणारे विशेष विधेयक येणार आहे. यात सर्व बाबींचा अंतर्भाव असेल. नियमबाह्य रुग्णवाहिका वाहतुकीबाबत परिवहन विभागाला तपासणीसह कारवाईची सूचना देणार आहे.
प्रवीण स्वामी, आमदार, उमरगा
'पुढारी'ने उघड केलेल्या रुग्णवाहिका सेवेतील त्रुटी राज्याच्या अपयशी आरोग्य धोरणाचा पुरावा आहेत. सरकारी रुग्णवाहिकांतील सुविधांच्या अभावामुळे रुग्णाच्या जीवाला धोका आहे. तर अनेकांचा मृत्यू झाला आहे. दुसरीकडे खाजगी रुग्णवाहिकांकडून आर्थिक लूट होत आहे. सर्व रुग्णवाहिकांत 'बाय पॅप'सह अत्यावश्यक उपकरणे देऊन खासगी सेवांचे कठोर नियम करावे; अन्यथा काँग्रेस तीव्र जनआंदोलन उभारेल.
उमेश राजेनिंबाळकर, काँग्रेस जिल्हाध्यक्ष
रुग्णवाहिकांमध्ये बाय पॅप, कार्डियाक सुविधा, प्रशिक्षित कर्मचारी व नियमित तपासणी जितकी गरजेची, तितकेच शवांसाठी शीतपेटीही आवश्यक आहे. सरकारी व्यवस्थेतील त्रुटींचा फायदा घेत काही खासगी रुग्णवाहिका चालक रुग्ण व नातेवाईकांची आर्थिक पिळवणूक करतात. ही लूट तातडीने थांबवून सक्षम सार्वजनिक रुग्णवाहिका व्यवस्था उभी करावी. या सर्व सुविधांचा अभाव असेल तर सर्वसामान्यांच्या हक्काची सार्वजनिक आरोग्य व्यवस्था कुचकामी ठरते.
अॅड. शीतल चव्हाण, उमरगा