Dharashiv News : स्मार्ट मीटरची सक्ती नको, शेतकऱ्यांना दिवसा वीज द्या

धाराशिव : ठाकरेंच्या शिवसेनेचे चक्काजाम आंदोलन
Dharashiv News
Dharashiv News : स्मार्ट मीटरची सक्ती नको, शेतकऱ्यांना दिवसा वीज द्याfile photo
Published on
Updated on

Dharashiv News : Don't force smart meters, give electricity to farmers during the day

धाराशिव, पुढारी वृत्तसेवा जिल्ह्यातील शेतकरी, सर्वसामान्य नागरिक आणि विद्यार्थ्यांना भेडसावणाऱ्या वीजपुरवठ्याच्या विविध समस्यांविरोधात शिवसेना (ठाकरे) पक्षाच्या वतीने गुरुवारी महावितरणच्या अधीक्षक अभियंता कार्यालयासमोर चक्काजाम आंदोलन करण्यात आले. यावेळी शेतकऱ्यांना दिवसा नियमित वीजपुरवठा, कमी दाबाचा प्रश्न, वारंवार होणारी आपत्कालीन लोडशेडिंग तसेच स्मार्ट मीटरसंदर्भातील विविध मागण्यांचे निवेदन अधीक्षक अभियंत्यांना देण्यात आले.

Dharashiv News
Beed Protest| सोनम वांगचुक यांच्या उपोषणाचे अंबाजोगाईत पडसाद, जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा

धाराशिव जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर वीज निर्मिती होत असतानाही शेतकऱ्यांना दिवसा नियमित, अखंडित आणि योग्य दाबाने वीज मिळत नसल्याबद्दल तीव्र नाराजी आंदोलकांनी व्यक्त केली. कमी दाबामुळे कृषी पंप सुरू होत नाहीत, ट्रान्सफॉर्मर वारंवार जळत आहेत आणि पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडत असल्याचा आरोप करण्यात आला. त्यामुळे शेतकऱ्यांना दिवसा किमान आठ तास अखंडित व योग्य दाबाने वीजपुरवठा करण्याची मागणी करण्यात आली.

जिल्ह्यात वारंवार होणाऱ्या आपत्कालीन लोडशेडिंगमुळे ग्रामीण भागातील जनजीवन विस्कळीत झाले असून विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर परिणाम होत आहे. माता-भगिनींना घरगुती कामे करताना अडचणी येत असून लघुउद्योग आणि व्यापाऱ्यांचेही नुकसान होत असल्याचे आंदोलनकर्त्यांनी सांगितले. वारंवार खंडित होणारा वीजपुरवठा रोखण्यासाठी आवश्यक तांत्रिक उपाययोजना तातडीने राबवाव्यात, अशीही मागणी करण्यात आली.

Dharashiv News
Parbhani ZP Meeting : झेडपीच्‍या सभेत विविध कामांच्‍या प्रश्नांचा भडिमार

स्मार्ट मीटरच्या मुद्द्यावरही आंदोलनकर्त्यांनी आक्रमक भूमिका घेत ग्राहकांच्या स्पष्ट संमतीशिवाय स्मार्ट मीटर बसविण्याची मोहीम तात्काळ थांबवावी, तसेच लेखी मागणी करणाऱ्या ग्राहकांना पूर्वीचे वीज मीटर पुन्हा बसवून द्यावेत, अशी मागणी केली. स्मार्ट मीटरनंतर वाढीव वीजबिलांच्या तक्रारी वाढल्याचा आरोपही यावेळी करण्यात आला. परिस्थिती सुधारावी, अन्यथा अधिक तीव्र जनआंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही यावेळी देण्यात आला.

आंदोलनात सहसंपर्कप्रमुख मकरंद राजेनिंबाळकर, माजी जिल्हाप्रमुख भारत इंगळे, महिला आघाडी जिल्हाप्रमुख शामल वडणे, प्रा. दिलीप पाटील, माजी शहरप्रमुख प्रवीण कोकाटे, युवासेना जिल्हाप्रमुख रवी वाघमारे, उपजिल्हाप्रमुख सागर बाराते, तालुकाप्रमुख राकेश सूर्यवंशी यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी, शिवसैनिक, शेतकरी व नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news