Dharashiv Election News
भीमाशंकर वाघमारे
धाराशिव : सर्वच वॉर्डात नगराध्यक्षपदाचे उमेदवार पायाला भिंगरी लावून पळत आहेत. शहराच्या विकासाचे मॉडेल सादर करीत आहेत. आजपर्यंत झालेल्या कामापेक्षाही अधिक चांगले काम करण्याचे 'वचन' मतदारांना देत आहेत; मात्र मतदार आपल्या मनाचा अंदाज कोणालाच लागू देत नसल्याने सर्वच इच्छुक उमेदवारांची सध्या तरी भंबेरी उडाल्याचे चित्र आहे.
आम्हाला गृहीत धरु नका. आम्ही विचार करुनच मतदान करीत असतो, असा मेसेज मतदार त्याच्या वर्तनातून देत आहेत. त्यामुळे प्रत्येक दारात जाऊन मतदारांसमोर लोंटागण घालण्याची वेळ सर्व उमेदवारांवर आली आहे. प्रत्येक पक्षाचे उमेदवार आजपर्यंत आम्ही कसे चांगले काम केले आहे, भविष्यात शहराचा चेहरामोहरा बदलणार आहोत, त्याची ही ब्लू प्रिंट आहे, असे सांगत मतदारांना आपलेसे करण्याचा प्रयत्न करीत असले तरी मतदारा मात्र प्रत्येक उमेदवाराला आम्ही तुमचेच आहोत. विनयशीलता याचा तुम्हालाच मतदान करु, असे सांगत आहेत. राजकारणी लोकांची निवडणूक काळातील वर्तणूक, अंदाज मतदारांना पूर्णपणे आलेला आहे. त्यामुळेच मतदारही आपली झाकली मूठ सव्वा लाखाची ठेवत आहे.
अजून दोन तारखेला खूप वेळ आहे. पाहू तेव्हाच, असे सांगत अनेक मतदार उमेदवारांना आल्या पावली माघारी पाठवत आहेत. एकतर्फी निवडणूक कोणासाठीच नाही..! जिल्ह्यातील धाराशिव, तुळजापूर, कळंब, उमरगा, भूम, परंडा, मुरुम आणि नळदुर्ग या आठ नगरपालिकांची निवडणूक होत आहे.
सोशल मिडियावर किंवा रिल्सच्या माध्यमातून सर्व पक्ष, उमेदवार आपणच कसे सरस आहोत, हे सांगण्याचा प्रयत्न करत असले तरी ग्राऊंड लेवलवर वेगळेच चित्र आहे. मतदार कोणालाच अंदाज देत नसल्याने सध्या तरी महायुतीसह महाविकास आघाडी असो की अन्य पक्ष, अपक्ष उमेदवार सर्वच उमेदवार तणावात असल्याचे चित्र आहे.