धाराशिव : ई-रिक्षा आणि ई-कार्ट चालविण्याची अनुज्ञप्ती घेऊ इच्छिणाऱ्या चालकांना आता किमान १० दिवसांचे प्रशिक्षण घेणे बंधनकारक करण्यात आले आहे. या प्रशिक्षण कालावधीत किमान पाच तास प्रत्यक्ष वाहन चालविण्याचे प्रशिक्षण घेणे आवश्यक राहणार आहे. शासनमान्य आणि केंद्रीय मोटार वाहन नियमांनुसार प्राधिकृत केलेल्या वैध मोटार ट्रेनिंग सेंटरमधूनच हे प्रशिक्षण घ्यावे लागणार आहे.
केंद्र शासनाने केंद्रीय मोटार वाहन नियम, १९८९ मधील नियम ८अ मध्ये सुधारणा केली आहे. त्यानुसार ई-रिक्षा व ई-कार्ट चालविण्याची अनुज्ञप्ती घेण्यासाठी १० दिवसांचे प्रशिक्षण आवश्यक करण्यात आले आहे. यासाठी राज्य शासनाने १० दिवसांच्या प्रशिक्षण अभ्यासक्रमास मान्यता दिली असून, त्याची काटेकोर अंमलबजावणी करण्याच्या सूचना परिवहन विभागाला देण्यात आल्या आहेत.
ई-रिक्षा व ई-कार्ट चालकांसाठी निर्धारित प्रशिक्षण शासनमान्य संस्थेमार्फत आणि निश्चित अभ्यासक्रमानुसार पूर्ण करणे आवश्यक आहे. प्रशिक्षणामध्ये किमान पाच तास प्रत्यक्ष वाहन चालविण्याचा सराव बंधनकारक असेल. तसेच शिकाऊ अनुज्ञप्तीसाठी परिवहन संवर्गातील सर्व नियम लागू राहणार आहेत.
चालकांकडे प्राधिकारपत्र आवश्यक
महाराष्ट्र मोटार वाहन नियमानुसार सार्वजनिक सेवा वाहन चालविणाऱ्या चालकाकडे विहित अनुज्ञप्तीसोबत प्राधिकारपत्र आणि ओळखपत्र बॅज असणे आवश्यक आहे. त्यामुळे संबंधित चालकांनी शासनमान्य संस्थेतून प्रशिक्षण पूर्ण करून आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करावी, असे आवाहन उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांनी केले आहे.
शिक्षणाचे महत्त्वाचे नियम
रिक्षा व ई-कार्ट चालकांसाठी १० दिवसांचे प्रशिक्षण बंधनकारक असून, त्यामध्ये किमान पाच तास प्रत्यक्ष वाहन चालविण्याचे प्रशिक्षण घेणे आवश्यक आहे. हे प्रशिक्षण शासनमान्य मोटार ट्रेनिंग सेंटरमधूनच घ्यावे लागणार आहे. विहित वाहनचालक अनुज्ञप्तीसोबत पीएसव्ही ॲथोरायझेशन तसेच ओळखपत्र बॅज धारण करणेही बंधनकारक आहे.