धाराशिव :जिल्ह्यात रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन काही बोगस डॉक्टरांनी अनधिकृत वैद्यकीय व्यवसाय सुरू केला आहे. अशा बोगस डॉक्टरांचा तात्काळ शोध घेऊन कठोर कारवाई करावी, तसेच भविष्यात कोणीही असा व्यवसाय करण्याचे धाडस करणार नाही, असा कायमस्वरूपी धडा मिळेल यासाठी आरोग्य विभागाने ठोस पावले उचलावीत, असे सक्त निर्देश जिल्हाधिकारी तथा अनधिकृत वैद्यकीय व्यवसायिक (बोगस डॉक्टर) शोधन जिल्हास्तरीय समितीचे अध्यक्ष कीर्ती किरण पुजार यांनी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आयोजित अनधिकृत वैद्यकीय व्यवसायिक (बोगस डॉक्टर) शोधन जिल्हास्तरीय समितीच्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. धनंजय चाकूरकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सतीश हरिदास, उपजिल्हा पोलीस अधीक्षक (मुख्यालय) तसेच तालुका आरोग्य अधिकारी, वैद्यकीय अधीक्षक, पथक प्रमुख व गट विकास अधिकारी यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
बैठकीत माहिती देताना जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. हरिदास यांनी सांगितले की, आतापर्यंत जिल्ह्यात 69 बोगस डॉक्टरांवर कारवाई करण्यात आली असून, त्यापैकी 17 प्रकरणांमध्ये पोलीस तपास सुरू आहे, तर 36 प्रकरणे न्यायप्रलंबित आहेत.जिल्हाधिकारी पुजार यांनी ग्रामीण व शहरी भागात विशेष शोध मोहीम राबवून बोगस डॉक्टरांवर कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले. मात्र कारवाई करताना संबंधितांची संपूर्ण माहिती तपासूनच कार्यवाही करावी, तसेच यापूर्वी गुन्हा दाखल असलेल्या प्रकरणांत न्यायालयाचा अवमान होणार नाही व शासन निर्णयांच्या अधीन राहून कारवाई करावी, असे त्यांनी स्पष्ट केले .
कारवाईदरम्यान पंचांच्या समक्ष व्हिडिओ शूटिंग, छायाचित्रण, मुद्देमाल जप्ती व सीलबंद प्रक्रिया करून जप्त मुद्देमाल संबंधित पोलीस ठाण्यात जमा करावा. स्थळपंचनामा स्वतंत्र फाईलमध्ये ठेवावा आणि संबंधित पोलीस ठाण्याचे ठाणेप्रमुख किंवा अधिकृत प्रतिनिधी उपस्थित असणे आवश्यक असल्याच्या सूचनाही देण्यात आल्या.
या बैठकीत बोगस डॉक्टरांवर महाराष्ट्र वैद्यकीय व्यवसाय अधिनियम, 1961 तसेच भारतीय न्याय संहिता, 2003 अंतर्गत गुन्हे नोंदविण्याचे आदेश देण्यात आले. यामध्ये वैद्यकीय नोंदणीशिवाय व्यवसाय करणे, अनधिकृत पदवी/उपाधी वापरणे, फसवणूक, तोतयागिरी, बनावट कागदपत्रे तयार करणे तसेच औषध व जादूटोणा (आक्षेपार्ह जाहिराती) अधिनियम, 1954 अंतर्गत कारवाईचा समावेश आहे.
शोधन समित्या : शोधन समित्यांची रचनाअनधिकृत वैद्यकीय व्यवसायिक (बोगस डॉक्टर) जिल्हास्तरीय, तालुकास्तरीय ग्रामीण व शहरी अशा तीन स्तरांवर कार्यरत आहेत. जिल्हास्तरीय समितीचे अध्यक्ष जिल्हाधिकारी असून, सदस्य म्हणून जिल्हा शल्यचिकित्सक, जिल्हा आरोग्य अधिकारी व सदस्य सचिव म्हणून उपजिल्हा पोलीस अधीक्षक (मुख्यालय) कार्य पाहतात.
तालुकानिहाय वैद्यकीय व्यावसायिकांची संख्या
धाराशिव 194, तुळजापूर 52, लोहारा 27, उमरगा 54, कळंब 51, भूम 39, वाशी 15 व परंडा 44 अशा प्रकारे आठ तालुक्यांतील ग्रामीण भागात एकूण 476 डॉक्टर कार्यरत आहेत.